सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाकडून २ ऑक्टोबर पासून विमानांमध्ये पुनर्वापर न होणाऱ्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर बंदी आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एलायंस एअरच्या विमानांमध्ये या निर्णयाची अमंलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एअर इंडियाच्या सर्वच विमानांमध्ये अशा प्लास्टिकवर बंदी असणार आहे.

विमानातील प्लास्टिक वापाराचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने एअरलाइनकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत विमानात चिप्स व सॅण्डवीच प्लास्टिक बॅगमध्ये दिले जात होते, मात्र या निर्णयानंतर ते बटर पेपरमध्ये दिले जाणार आहेत. जेवणाच्या बॉक्समध्ये असलेल्या प्लास्टिकने गुंडाळलेल्या केकला आता मफिन्समध्ये बदलले जाणार आहे. स्पेशल थाळी देताना प्लास्टिकच्या वस्तूंच्या जागी लाकडी किंवा हलक्या स्टीलच्या वस्तूंचा वापर केला जाणार आहे. चहा, कॉफासाठी व पाणी पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास ऐवजी जाड कागदी ग्लास दिले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकच्या वापराचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर हे एअर इंडियाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी भारताला पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिक पासून मुक्त बनवण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल उचलले जात असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर केले जाणार आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीप्रमाणे पंतप्रधान मोदी २ ऑक्टोबर रोजी देशभरात प्लास्टिक बॅग, कप आणि स्ट्रा इत्यादींवर बंदीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही बंदी सर्वसमावेशक असेल यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आणि आयात तसेच कप, प्लेट्स, छोट्या बाटल्या, विशिष्ट प्रकारच्या पाकीटांचे उत्पादन आदींचाही यात समावेश असेल.

पहिल्या सहा पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आल्यास भारताच्या वार्षिक १४ दशलक्ष टन प्लास्टिक वापराच्या प्रमाणात साधारण ५ ते १० टक्के घट होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर, बंदीच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यास सुरूवातीच्या सहा महिन्यानंतर दंड आकरणे सुरू होईल, तोपर्यंत लोकांना यासाठी असलेल्या पर्यायांची सवय करून घेण्यास वेळ दिला जाण्याची शक्यता आहे.