Air India to cut international widebody flights by 15 per cent : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने बुधवारी मोठी घोषणा केली आहे. एअर इंडियाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय वाइड-बॉडी विमानांच्या उड्डाणांमध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात तात्काळ प्रभावाने सुरू करण्यात आली असून ही किमान जुलैच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे. अहमदाबाद येथे झालेली विमान दुर्घटना, मध्य-पूर्वेत सुरू असलेला इराण-इस्त्रायल संघर्ष आणि बोईंग ७८७ ड्रीमलायनरची होत असलेल्या सुरक्षा तपासणी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एअर इंडियाकडून दररोज ७० आंतरराष्ट्रीय उड्डाणे त्यांच्या वाइड-बॉडी विमाने म्हणजेच बोईंग ७८७ ड्रीमलायनर, बोईंग ७७७ आणि एअरबस ए३५० च्या माध्यमातून करते. एअरलाईनने घेतलेल्या या निर्णयाच्या मागे अनेक कारणे आहेत.

पश्चिमात्या देशांकडे जाणाऱ्या विमान मार्गांवरील हवाई क्षेत्रात (एअरस्पेस) बंदी घालण्यात आल्याने विमान प्रवासाचा वेळ वाढला आहे, यामुळे विमानांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. याबरोबरच मागील गुरूवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय ७१७ ला अपघात झाल्यानंतर बोईंग ७८७ विमानांच्या सुरक्षिततेची तपासणी केली जात आहे. ज्यामुळे या विमानांची उड्डाण क्षमता मर्यादित झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २ जून ते १७ जून या दरम्यानच्या काळात एअर इंडिया त्यांच्या वाइड-बॉडी ताफ्यातून एकूण ५४५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे संचलन कराणार होती, यापैकी ६६२ उड्डाणेच पूर्ण होऊ शकली. तर ८३ उड्डाणे रद्द करावी लागली. ज्यानुसार एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानांचा कॅन्सलेशन रेट १५.२ टक्के इतका नोंदवला गेला आहे. या आकडेवारीच्या आधारे एअरलाइनने त्यांच्या शेड्यूलमध्ये बदल करत हा निर्णय घेतला आहे आणि एअर इंडियाच्या क्षमतेनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १५ टक्क्यांची कपात केली जाईल.

अहमदाबाद विमान अपघाताचा फटका

१२ जून रोजी लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान एआय-१७१ अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ केल्यानंतर लगेचच कोसळले. या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्यासह जमिनीवरील अनेकांचा मृत्यू झाला. यानंतर नागरी उड्डाण निदेशालयाने एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ आणि ७८७-९ ताफ्याच्या सखोल तपासणीचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ३३ बोईंग ७८७ विमानांपैकी २६ विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे आणि त्यांना सेवेसाठी मंजूरी देण्यात आली आहे. उर्वरित विमानांची तपासणी येत्या काही दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. याबरोबरच विमान कंपनीने खबरदारी म्हणून त्यांच्या बोईंग ७७७ ताफ्याची देखील सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.