India vs Pakistan Operation Sindoor Latest Updates : पाकिस्तानने हरियाणाच्या सिरसाच्या दिशेने केलेला हवाई हल्ला रोखण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. सिरसाच्या जिल्हा प्रशासनाने म्हटलंय की क्षेपणास्त्रासारखं अवशेष सिरसाच्या दोन ठिकाणी आढळून आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत जात असून पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीत हल्ले करायला सुरुवात केली आहे. पण पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावण्याचा चोख प्रयत्न भारताकडून सुरू आहे. भारतीय लष्कराचे तिन्ही दल अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवत असून त्यांची प्रत्येक कारवाई हाणून पाडली जात आहे.
दरम्यान, हरियाणाच्या सिरसा येथे क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत. सिरसा जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हवाई दलाच्या तळाजवळील सिरसा येथील शेतात दोन ठिकाणी क्षेपणास्त्रासारख्या वस्तूंचे अवशेष आढळले. भारतीय हवाई दल आणि जिल्हा पोलिसांच्या पथकांनी दोन्ही ठिकाणी पोहोचून मलबा गोळा केला आणि तो बाहेर काढला.
तीन जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकाऊट
शुक्रवारी संध्याकाळपासून, पंचकुला, अंबाला आणि पानिपत या हरियाणातील तीन जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजल्यापासून पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला. सिरसा जिल्ह्याचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत शनिवारी संपूर्ण वीजपुरवठा खंडित राहणार आहे. अंबाला हवाई दलाच्या तळावरही हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणातील सर्व ७,५०० गावांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रुग्णालयांना बेड राखीव ठेवण्याचे निर्देश
चौधरी देवीलाल विद्यापीठाने आज शनिवार आणि रविवारच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्य सरकारने सर्व शिक्षण विभागातील अधिकारी/अधिकाऱ्यांच्या, विशेषतः सिरसा, फतेहाबाद, कैथल, जिंद, कुरुक्षेत्र आणि अंबाला येथे तैनात असलेल्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने सर्व खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांना २५ टक्के बेड राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.