रिलायन्सची जिओ धन धना धन ही ऑफर म्हणजे नव्या बाटलीमध्ये जुनी दारू आहे असे म्हणत एअरटेलने टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे धाव घेतली आहे. जिओने समर सरप्राइज ऑफर बंद करुन धन धना धन ही ऑफर सुरू केली आहे. दोन्ही ऑफर्सची वैशिष्ट्ये समान आहेत. त्यामुळे ही ऑफर बंद करावी अशी मागणी एअरटेलने ट्रायकडे केली आहे. रिलायन्सच्या या ऑफरमुळे टेलिकॉम कंपन्यांचे नुकसान होत असल्याचे एअरटेलच्या प्रवक्त्यांनी म्हटले. टेलिकॉम कंपन्यांची स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे इतर स्पर्धकांना या प्रमाणे ऑफर देणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रिलायन्सने जिओ प्राइमसोबत दिलेली तीन महिन्यांची कॉम्पलिमेंटरी सेवा बंद करा असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर दिली. या नव्या ऑफरचे नवा जिओ धन धना धन असे असून जिओ समर सरप्राइज ऑफरप्रमाणेच सर्व सुविधा याद्वारे मिळणार असल्याचे म्हटले. या नव्या ऑफरद्वारे तुम्हाला तीन महिन्यांसाठी अमर्यादित डेटा मिळणार आहे, फ्री एसएम एस सर्व्हिस, जिओ अॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ प्राइमचे सबस्क्रिप्शन घेऊन ३०९ आणि ५०९ रुपये भरणे आवश्यक आहे. ही ऑफर घेतल्यास दररोज २ जीबी ४ जी डेटा वापरता येणार आहे. ज्या लोकांना जिओ समर सरप्राइज ऑफर वापरता येणार नाही त्यांच्यासाठी ही नवी ऑफर देण्यात येणार आहे. यापुढे तुम्हाला समर सरप्राइज ऑफर द्वारे कॉम्प्लिमेंटरी सेवा बंद करावी लागेल असे ट्रायने सुनावले होती तरी सुद्धा नव्या नावाने जिओने ही ऑफर लाँच केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रायने आदेश दिल्यानंतर रिलायन्सने जिओ समर ऑफर रद्द केली. रिलायन्स जिओने तीन महिन्यांसाठी जिओ समर सरप्राइज ऑफर देऊ केली होती. ट्रायने ही ऑफर रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर या ऑफरचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. १५ एप्रिल पर्यंत ज्या ग्राहकांनी या ऑफरसाठी प्राइम मेंबरशिपची नोंदणी करुन ३०३ रुपये भरले त्यांना तीन महिन्यांची सेवा मोफत मिळणार आहे. ही सेवा यापुढे मोफत देऊ नका असे आदेश टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने दिले आहेत. ज्या ग्राहकांनी हे आदेश मिळण्याच्या आधी प्राइम मेंबरशिप घेऊन ३०३ चे रिचार्ज केले आहे त्यांच्यासाठी ही ऑफर सुरू राहणार आहे असे जिओनी सांगितले होते. ट्रायच्या आदेशानंतर जुनी ऑफर त्यांना गुंडाळावी लागली परंतु नव्या धन धना धन ऑफर द्वारे तीच सेवा रिलायन्स जिओ पुरवणार आहे. याच ऑफर विरोधात एअरटेलने ट्रायकडे धाव घेतली असून त्वरित ही ऑफर बंद करावी असे म्हटले आहे.