AIUDF MLA Aminul Islam : आसाममधील नागाव येथील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट पक्षाचे नेते व ढिंग विधानसभेचे आमदार अमिनुल इस्लाम यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा बचाव केल्याचा आरोप आहे, गुरूवारी अधिकार्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
तीन वेळा आमदार राहिल्या इस्लाम यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी चिथावणीखोर आणि दिशाभूल करणारे विधान केले, जे नंतर व्हायरल झाले होते आणि यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
इस्लाम यांना बुधवारी जामीनावर सोडण्यात आले, पण त्यानंतर त्याच आरोपात एनएसए अंतर्गत त्यांना लगेच नागाव मध्यवर्ती तुरूंगातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आणि त्याच ठिकाणी ठेवण्यात आले, असे नागावचे एसपी स्वप्नील डेका यांनी सांगितले. प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कारण देत पोलीस अधिकाऱ्यांनी यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, नागावचे उपायुक्त आणि डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांनी ढिंगचे आमदार अमीनुल इस्लाम यांना नॅशनल सेक्युरिटी अॅक्ट, १९८० च्या कलम ३(२) अंतर्गत प्रतिबंधात्मक कैदेत ठेवले आहे.
नागावच्या पोलीस अधीक्षकांच्या एका रिपोर्टमध्ये पंचायत निवडणूक प्रचारात आमदाराने केलेले भडकावू भाषण आणि पहलगाम दहशतवादी हल्ला आणि सरकारी कट कारस्थान यांना जोडणारे भडकावू आणि बिनबुडाचा दावे करणारा व्हिडीओ प्रसारित झाल्याचे नमूद करण्यात आले, त्यानंतर हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एनएसए डोजियरमध्ये आमदाराविरोधात नोंदवलेल्या पहिल्या २३ गुन्ह्यांचा संदर्भ आहे.
इस्लाम यांना सुरुवातीला चार दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २९ एप्रिलपासून ते तुरुंगात आहेत.
२३ एप्रिल रोजी पंचायत निवडणूक प्रचारावेळी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आमदार इस्लाम हे पहलगाम आणि पुलवामा हल्ले हे देशाचे धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करू इच्छिणाऱ्यांनी घडवून आणल्याचा आरोप करताना दिसून आले होते.
ऑल इंडिय युनायटेड डेमोक्रॅट फ्रंट (एआययूडीओफ)ने मात्र आमदाराच्या वक्तव्यापासून अंतर राखले होते. पक्षाने हे मत वैयक्तिक असून ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते.
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी देखील झाले होते. तर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते.