मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जे भाषण केले त्यातून त्यांनी वस्तुस्थितीच समोर आणली आहे. या सभेची चर्चा राज्यभरात सुरू असल्याने सत्ताधारी भाजपला राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल घ्यावी लागली. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर टीका केली. राज ठाकरे यांच्या सभेचा प्रतिसाद पाहता शिरुरमध्ये सभा घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, कार्यकर्त्यांची मागणी असल्यास मी त्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांसाठी बारामती येथे 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार होती. मात्र ती आता पुढील टप्प्यात होणार असल्याचे समजते. तसेच माझ्याही विधानसभेवेळी त्यांची सभा झाली. तरी मला लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असल्याचे सांगत मोदींची लाट नसल्याचे त्यांनी सांगितले.