लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढू लागला असतानाच बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सव्वातास चर्चा केली. मुंडे यांच्या बचावासाठी अजित पवारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला साकडे घातल्याचे मानले जात आहे.

देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निष्ठावान वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. मात्र मुंडे यांच्या विरोधात पुरावे असल्याशिवाय राजीनामा घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष अजित पवार यांच्याकडे सोपवल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी फडणवीस यांची भेट घेऊन मुंडेंवरील दबाव कायम ठेवला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शहांची भेट घेतल्याने मुंडेंचे भवितव्य दिल्लीत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>>आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार हे प्रफुल पटेल व पार्थ पवार यांच्यासह दिल्लीत दाखल झाले. धनंजय मुंडे यांच्या भगिनी व राज्यातील मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी दिल्लीत होत्या. त्यांनीही शहांची भेट घेतली होती. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शहांची भेट घेऊन बीड प्रकरणाची सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे महायुतीतूनही अजित पवारांवरील दबाव वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.