अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सापडल्याने सध्या खळबळ उडाली आहे. सोमवारी बाघंबरी मठातील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. ते निरंजनी आखाड्याचे प्रमुखही होते. अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडीदेखील रेकॉर्ड केला होता. नरेंद्र गिरी यांचे शिष्य निर्भव द्विवेदी यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ ताब्यात घेतला असून तपास सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महंत त्यांच्या खोलीत छताला टांगलेल्या अवस्थेत आढळल्याचे अलाहाबादचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितलं आहे. मात्र त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत. महंत यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच पोलीस व प्रशासनातील अनेक अधिकारी मठात पोहोचले होते. हे सर्वजण मठाबाहेर तळ ठोकून आहेत. पोलिसांव्यतिरिक्त कुणालाही मठात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

व्हिडीओत नरेंद्र गिरी यांनी सुसाईट नोटमध्ये केलेला उल्लेख बोलून दाखवला असल्याचं निर्भय द्विवेदी यांनी सांगितलं आहे. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये काही लोकांचा उल्लेख केला असून त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे.

“मी सन्मानाने जगलो असून अपमान सहन करत जगू शकत नाही. यामुळेच मी आत्महत्या करत आहे,” असं नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ पानांच्या या सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला असून यामुळेच आपण आयुष्य संपवत असल्याचं म्हटलं आहे.

प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र गिरी यांचा शिष्य अनंत गिरी याचाही सुसाईड नोटमध्ये इतरांसोबत उल्लेख आहे. पोलिसांनी त्याला उत्तराखंडमधून ताब्यात घेतंल आहे.


दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी अनंत गिरी यांनी गुरुजी आत्महत्या करणाऱ्यांपैकी नसून पैशांसाठी त्यांना त्रास दिला जात होता असा आरोप केला होता. तसंच माझ्याविरोधात मोठं षडयंत्र असून निष्पक्ष तपास झाला पाहिजे असंही म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya akhara parishad mahant narendra giri recorded video before death sgy
First published on: 21-09-2021 at 09:09 IST