उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ईदच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी लखनऊच्या ऐशबाग ईदगाह येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिलेश यांनी एका लहान मुलाला ईदी म्हणून दोन हजार रूपयांची नोट दिली. यावेळी अखिलेश यांनी केलेल्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अखिलेश ईदी देताना लहान मुलाला म्हणाले की, मी तुला दोन हजारांपेक्षा जास्त पैसे रोख स्वरुपात देऊ शकत नाही आणि तू तेवढे पैसे घेऊही शकत नाहीस. अन्यथा आपल्या दोघांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे अखिलेश यांनी म्हटले. अखिलेश यादव यांच्या या विधानाचा रोख काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षांवर देणगी स्वीकारण्यासंदर्भात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या दिशेने होता. राजकीय पक्षांना दोन हजारांपुढील देणग्या धनादेश किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवहाराच्या स्वरूपात घ्याव्या लागतील, असा नियम केंद्र सरकारने केला होता.

घाव ‘अज्ञात’ राजकीय देणग्यांवर..

दरम्यान, ऐशबाग ईदगाह येथील कार्यक्रमातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थितीही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ईदच्या कार्यक्रमाला हजर राहतात. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी यंदा ही परंपरा मोडीत काढली. त्यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा या कार्यक्रमाला हजर होते. या मुद्द्यावरूनही अखिलेश यादव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले नाही म्हणून काय झाले, माजी मुख्यमंत्री तर आले आहेत, अशी मिष्किल टिप्पणी अखिलेश यांनी केली.