नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केंद्र सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना केली. पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ सुरक्षा यंत्रणेतील एक त्रुटी होती असे न म्हणता गुप्तचर यंत्रणांना हल्ल्याची पूर्वसूचना देण्यात अपयश आल्याची जबाबदारी निश्चित करायला हवी अशी मागणी अखिलेश यांनी केली. ही जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न त्यांनी विचारला.
पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक थांबवल्याबद्दल अन्य विरोधकांप्रमाणे अखिलेश यादव यांनीही प्रश्न उपस्थित केला. हा शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली करण्यात आला असे त्यांनी विचारले. भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरले असून चीन हा देश आपली जमीन आणि बाजारपेठ बळकावणारा राक्षस आहे अशी टीका अखिलेश यांनी केली.
“महत्त्वाच्या मुद्द्यावर देश जागतिक पातळीवर एकटा पडला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान कोणताही देश आपल्याबरोबर उभा राहिला नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या मुत्सद्देगिरीचा हा काळा अध्याय आहे,” असा शाब्दिक हल्लाबोल अखिलेश यांनी केला. शेजारी देशांबरोबरच्या संबंधांबद्दलही त्यांनी टीका केली. “आपले शेजारी देश एकतर आपल्यावर हल्ले करत आहेत किंवा ते आपल्याला पाठिंबा देत नाहीत. पाकिस्तानच्या दहशतवादाइतकाच धोका आपल्याला चीनकडून आहे,” असा इशाराही अखिलेश यांनी दिला.