Aligarh cow vigilante assault case: उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी चार जणांवर हल्ला केला होता. यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी बुधवारी सांगितले की, ज्यांना मारहाण झाली आहे, ते गोमांस वाहतूक करत नसल्याचे फॉरेन्सिक अलवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान पोलिसांनी यापूर्वी मारहाण झालेले पीडित लोक म्हशीचे मांस वाहतूक करत होते, असे सांगितले होते. हरदुआगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान शनिवारी अलिगडमधील अलहदादपूर गावाजवळ ही घटना घडली होती. गोरक्षकांनी अकील (४३), अरबाज (३८), अकील (३५) आणि नदीम (३२) यांना गोमांस वाहतूक केल्याचा आरोप करत लोखंडी सळईने मारहाण केली होती. याचबरोबर आरोपींनी पीडितांचे वाहनही पेटवून देत त्यांचे फोन आणि पैसेही चोरले होते.

या घटनेबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये विजय गुप्ता (५०), भानु प्रताप (२८), लव कुश (२७) आणि विजय बजरंगी (२३) यांचा समावेश आहे.

हल्ल्यातील पीडित अकीलचे वडील सलीम खान यांनी शनिवारी हरदुआगंज पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनंतर एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३८ जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये १३ जणांची नावे देण्यात आली असून, २५ अज्ञात आरोपींचाही समावेश आहे. या गुन्ह्यात विजय गुप्ता, विजय बजरंगी आणि लव कुश यांचीही नावे आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

अकीलचे वडील सलीम खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित अल-अंबर येथील एका मांस कारखान्यातून खरेदी केलेले मांस वाहतूक करत होते. वाहन पनैथी रोडवर पोहोचताच, आरोपी वाहनाजवळ आले आणि पीडितांकडून खंडणीची मागणी केली. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ५०,००० रुपये देण्यास नकार दिल्याने पीडितांवर हल्ला करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मारहाण प्रकरणातील आरोपी विजय बजरंगी यांच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अज्ञातांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंगी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना गोमांस वाहतुकीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अल्हादपूर गावाजवळ एका वाहनाचा पाठलाग केला. त्यांनी असाही आरोप केला आहे की, जेव्हा त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाहन चालकाने त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.