सर्वपक्षीय पथक गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरला ४ सप्टेंबर रोजी भेट देणार असून त्या वेळी तेथील विविध स्तरांतील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. काश्मीरमध्ये गेले ५१ पेक्षा अधिक दिवस संघर्ष सुरू असून तो हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर सुरू झाला आहे. गृहमंत्रालयाच्या प्रवक्तयाने सांगितले की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ ४ सप्टेंबरला काश्मीरला जाणार आहे. विविध स्तरांतील लोक व संघटनांशी या वेळी चर्चा केली जाईल.
राजनाथ सिंह यांनी काल भाजप अध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरूण जेटली व पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीतील सोपस्कारांविषयी चर्चा केली. नेमके कुठल्या व्यक्ती व गटांना भेटायचे यावर विचार करण्यात आला. विविध पक्षांनी सर्वपक्षीय पथकासाठी त्यांच्या प्रतिनिधींची नावे सुचवावीत असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच असे सांगितले होते की, ममता व एकता हा काश्मीर प्रश्नावरील मूलमंत्र आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी पंतप्रधानांची भेट घेऊन तीन कलमी कार्यक्रम मांडला होता.
पेलेट गनवर सरसकट बंदी नाही
काश्मीरमध्ये पेलेट गनमुळे अनेक युवक जखमी झाले व त्यात काहींचा मृत्यू झाला, त्यामुळे या गनवर बंदी घालण्याची मागणी होत असली तरी ही बंदी सरसकट घातली जाणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुर्मीळात दुर्मीळ घटनेत त्यांचा वापर करता येईल असे सूचित करण्यात आले आहे. सुरक्षा दलांशी चर्चेनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पेलेट गनचा पर्याय राहील पण तो क्वचितच करता येईल, असे सांगण्यात आले.
काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर मांडा– हुसेन
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी काश्मीरचा प्रश्न सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करावा, असे पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीरच्या अध्यक्षांचा सत्कार करताना ते म्हणाले की, पाकिस्तानचा काश्मिरी लोकांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काला नैतिक, राजकीय व राजनैतिक पाठिंबा आहे. पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान यांनी त्यांच्या अनुभवाचा वापर करून काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करावा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरप्रश्नी जगातील देशांच्या राजधान्यांना भेट देऊन त्यावर पाकिस्तानची भूमिका ठसवण्यासाठी २२ खासदारांची दूत म्हणून नेमणूक केली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष हुसेन यांनी सांगितले की, भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये केलेल्या अत्याचारांचा आम्ही निषेध करतो.
काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी उठवली
तीन पोलीस ठाण्यांचे क्षेत्र वगळता संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी सोमवारी उठवण्यात आल्यामुळे श्रीनगरमधील परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. दहशतवादी बुऱ्हान वानी मारला गेल्यानंतर गेले ५१ दिवस राज्यात संचारबंदी लागू होती.
पुलवामा शहर आणि श्रीनगरमधील एम.आर. गंज व नौहट्टा या दोन पोलीस ठाण्यांचे क्षेत्र वगळता काश्मीरमधून संचारबंदी उठवण्यात आली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे र्निबध हटवण्यात आल्याचे तो म्हणाला. असे असले तरी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा दले पुरेशा संख्येने तैनात राहणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
दक्षिण काश्मीरातील अनंतनाग जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वानी मारला गेल्यानंतर हिंसाचार उसळल्यामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यात ९ जुलैपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. या हिंसाचारात दोन पोलिसांसह ६८ लोक मारले गेले असून, हजारो लोक जखमी झाले आहेत.
सार्वजनिक वाहतूक अद्याप सुरू झालेली नसली, तरी आज सकाळपासून खासगी मोटारी व ऑटोरिक्षा यांची रस्त्यावरील वाहतूक वाढली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.