पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. भारत थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून ओळखला जायचा तो आता करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मानवाच्या संरक्षणासाठी लस घेऊन पुढे आला आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मोदींनी करोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचं श्रेय हे कोणत्याही एका सरकारला जात नसल्याचं मोदींनी म्हटलं आहे. “करोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचं श्रेय कोणत्याही सराकरला किंवा एखाद्या व्यक्तीला जात नसलं तरी ते भारताला तर जातं,” असं म्हणत मोदींनी करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी झालेल्या भारतीयांचं कौतुक केलं. भारताच्या या करोनाविरुद्धच्या लढाईबद्दल सर्वांना गर्व असला पाहिजे आणि या गोष्टीबद्दल आत्मविश्वासाने बोलणं गरजेचं आहे असंही मोदी म्हणाले.

संपूर्ण जग आज वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत आहे. मानवावर अशाप्रकारचे संकट येईल, अशा संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागेल असा विचार आपण कधीच केला नव्हता. मात्र या सर्व संकटांवर मात करुन आपण यशस्वीपणे एक आदर्श निर्माण केल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेकांनी भारतासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच वेळीच भारताने स्वत:ला सावरलं नाही तर केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानव जातीवर हे करोनाचं संकट अधिक जास्त धोकादायक ठरेल अशी शक्यता सर्वांनी व्यक्त केल्याचा संदर्भ मोदींनी आपल्या भाषणात दिला.

 

पुढे बोलताना मोदींनी, भारताबद्दल शंका उपस्थित केल्या जात असतानाच या महामारीच्या कालावधीमध्ये भारताने जागतिक स्तरावर आपलं स्थान पक्क केलं. तसेच जागतिक स्तरावर आपली प्रमिता आणखीन ठसठशीत करण्यात भारताला यश मिळालं. त्याचप्रमाणे या संकटाचा संधी म्हणून फायदा करुन घेत भारताने एख संघराज्य म्हणून आपण किती सक्षम आहोत हे दाखवून दिलं. सर्वच राज्यांनी आणि तेथील सरकारांनी दिलेलं सहकार्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो असं मोदी म्हणाले.

एकीकडे जगभरामध्ये भारताचे कौतुक होत असताना दुसरीकडे आपणच आपल्या या लढ्यावरुन शंका उपस्थित करत आहोत, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. करोना विरुद्धच्या लढाईमध्ये आपण यशस्वी ठरल्याचं अभिमानाने सांगितलं पाहिजे असा सल्लाही मोदींनी विरोधकांचे थेट नाव न घेता दिला.