पीटीआय, उत्तरकाशी
उत्तरकाशी येथील बांधकामाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेले सर्व चाळीस मजूर सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क स्थापित झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, बचावकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे घटनास्थळी पोहचले आहेत. या सर्व मजुरांची सुटका होण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.अडकलेल्या मजुरांसाठी सुटकेचा मार्ग तयार करण्याचा रात्रभर प्रयत्न केलेल्या बचाव पथकांनी त्यांना अन्न व पाणी पुरवले आहे, असे सिलक्यारा पोलीस ठाण्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले. मजूर गेल्या तीस तासांपासून बोगद्यात अडकले आहेत. ब्रह्मखाल- यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा- डंडालगाव दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला होता.
जिल्हा आकस्मिक कृती केंद्राने अडकलेल्या मजुरांची यादी जारी केली आहे. त्यानुसार, त्यांच्यापैकी १५ झारखंडमधील, आठ उत्तर प्रदेशातील, पाच ओडिशातील, चार बिहारमधील, तीन पश्चिम बंगालमधील, प्रत्येकी दोन उत्तराखंड व आसाममधील, तर एक हिमाचल प्रदेशातील आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वाची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे धामी यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. ‘अडकलेल्या मजुरांची सुरक्षित सुटका करण्यास आमचे प्राधान्य आहे. बचाव कार्य वेगाने करण्यात येत आहे. मजुरांची लवकरच सुटका केली जाईल अशी हमी मी त्यांच्या कुटुंबीयांना देऊ इच्छितो’, असे ते म्हणाले. मजुरांची सुटका करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बचाव कार्याची तपशीलवार माहिती घेतली असून, शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा ३२ वर्षांचा संसार संपुष्टात, घटस्फोटाचा निर्णय
पोलादी पाइपच्या सहायाने सुटकेचे प्रयत्न
अडकलेल्या मजुरांची एक मीटरहून कमी लांबीच्या पोलादाच्या नळीच्या सहायाने सुटका करण्याचे आपले नियोजन आहे, असे उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्याचे बांधकाम करत असलेल्या कंपनीने म्हटले आहे.
बोगद्यात पडणारा चिखल हटवणे, तसेच बचाव कार्यात अडथळा आणणारा सुटा राडारोडा शॉर्टक्रेटिंग पद्धतीने, म्हणजे काँक्रीटची फवारणी करून स्थिर करणे ही कामे सुरूच असून, अडकलेल्या मजुरांना इतरत्र हलवण्यासाठी ९०० मिलिमीटर व्यासाची पोलादाची नळी हायड्रॉलिक जॅकच्या आत घालण्याची योजना आहे, असे या बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एनएचआयडीसीएल) सोमवारी दुपारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले.