रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया (Raymond MD Gautam Singhania) यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा ३२ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. आमच्या मुलांसाठी जे काही चांगलं आहे ते आम्ही करत राहू असं म्हणत लग्नाच्या ३२ वर्षानंतर वेगळे होत असल्याचा निर्णय या दोघांनी जाहीर केला आहे.

काय म्हटलं आहे गौतम सिंघानिया यांनी?

ही दिवाळी आत्तापर्यंत आलेल्या दिवाळीसारखी नाही. ३२ वर्षांपासून आम्ही एकमेकांचे जोडीदार म्हणून एकत्र होतो. एकमेकांचे सहकारी म्हणून आणि आमच्या मुलांचे आई वडील म्हणून आमचं नातं फुललं. आम्ही कठीण प्रसंगात एकमेकांसाठी आधार झालो, एकमेकांची ताकद झालो. आम्ही एकमेकांचे होऊन वाटचाल करत होतो.

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटना दुर्दैवी होत्या. मी त्यावर विचार केला. आमच्या आयुष्याबाबत अनेक बिनबुडाच्या गोष्टी आणि अफवा पसरवण्यात आल्या. त्या सगळ्या आमच्या हितचिंतकांनी पसरवल्या नाहीत हे मला माहीत आहे. मात्र आम्ही म्हणजे मी आणि माझ्या पत्नी नवाजने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या आयुष्यात हिऱ्याप्रमाणे आलेल्या आमच्या दोन मुली निहारिका आणि निसा यांच्यासाठी आम्ही आमची कर्तव्यं पार पाडू. असं म्हणत एक भावनिक पोस्ट गौतम सिंघानिया यांनी लिहिली आहे.

कापडापासून ते रिअल इस्टेटपर्यंतच्या क्षेत्रात कार्यरत असलेला रेमंड (Raymond) हा देशातील मोठ्या उद्योग समुहांपैकी एक उद्योग समूह आहे. या समुहाचे मालक गौतम सिंघानिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यंदाची दिवाळी पूर्वीसारखी असणार नाही. नवाज आणि मी इथून पुढे वेगळे मार्ग पत्करले आहेत. आम्ही एकमेकांपासून विभक्त होत आहोत. निहारिका आणि निसा या आमच्या दोन मुलींसाठी आम्ही जे सर्वोत्तम आहे ते करत राहिन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी गौतम सिंघानिया हे त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्याशी झालेल्या वादांमुळे चर्चेत आले होते. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड या समूहाची स्थापना केली. रेमंड हा कापड उद्योगातला असा ब्रांड आहे ज्या ब्रांडने मोठं नाव कमावलं आणि कापड व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली. विजयपत सिंघानिया यांनी सुरु केलेला हा ब्रांड गौतम सिंघानिया यांनी एखाद्या वटवृक्षाप्रमाणे मोठा केला. आता याच गौतम सिंघानिया यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.