Allahabad High Court : न्यायालयांमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी होत असते. यामध्ये दिवाणी, फौजदारी आणि इतर कायदेशीर खटल्यांचा समावेश असतो. आता अशाच एका खटल्यावरील सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीची चर्चा रंगली आहे. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिला ५०० पैकी ४९९ गुण मिळण्याचा दावा करत अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत विद्यार्थिनीला २० हजारांचा दंड ठोठावला आहे.
नेमकं काय घडलं?
कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने कानपूर येथील एका विद्यापीठावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि तिला तिच्या पहिल्या सत्रातील एलएलबी परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळण्याचा दावा केला. मात्र, तिला चुकून फक्त १८१ गुण देण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या विरोधात तिने थेट अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या विद्यार्थिनीच्या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली. तसेच तिने कोणत्याही आधाराशिवाय विद्यापीठाच्या निर्णयाला आव्हान दिल्याबद्दल तिला २०,००० रुपयांचा दंड ठोठावला. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
दरम्यान, याचिकाकर्ती विद्यार्थिनी ही सध्या कानपूर येथील एका विद्यापीठात पाच वर्षांच्या एलएलबीचं शिक्षण घेत आहे. तिने न्यायालयात असा युक्तिवाद केला की तिला चुकून फक्त १८१ गुण देण्यात आले आहेत. पण आपण ५०० पैकी ४९९ गुण मिळवल्याचा दावा तिने केला. मात्र, तिचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तिलाच फटकारलं आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत कर, असं सांगितलं.
या विद्यार्थिनीने विद्यापीठावर तिच्या मार्काबाबत आरोप केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कायदा विद्याशाखेच्या समितीमार्फत तिच्या ओएमआर शीटचं पुनर्मूल्यांकन केलं आणि कमी गुणांची पुष्टी केली. मात्र, तरीरीही तिचं समाधान झालं नाही. दरम्यान, न्यायालयाने विद्यापीठाचे पुनर्मूल्यांकन स्वीकारत विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावली आणि तिला २०,००० रुपयांचा दंड ठोठावला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
