एक्स्प्रेस वृत्त, श्रीनगर : पाकिस्तानमधील वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या जागांवर, तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी काश्मीरमधील विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याप्रकरणी येथील फुटीरवादी नेत्यांविरोधात न्यायालयाने आरोपांची निश्चिती केली आहे. 

या प्रकरणी जम्मू आणि काश्मीर राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) चार महिन्यांपूर्वी श्रीनगरमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी विशेष न्यायाधीश मनजितसिंग मनहास यांनी फुटीरवादी नेते जफर अकबर भट, त्यांचे बंधू अल्ताफ अहमद भट, काझी यासीर आणि अन्य चार जणांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, या आरोपींनी काश्मिरी विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्यासाठी पाकिस्तानातील काही शैक्षणिक संस्थांबरोबर हातमिळवणी केली होती. या प्रवेशांच्या बदल्यात आरोपींना मोठी आर्थिक कमाई झाली. हा पैसा दहशतवादी, काश्मीरमध्ये दगडफेकीसारखे प्रकार करणारे समाजकंटक आणि भूमिगत कारवाया करणाऱ्यांकडे विघातक कारवायांसाठी वळविण्यात आला होता. पाकिस्तानातील शिक्षण संस्था, विद्यापीठांत काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव आहेत. विशेषत: हिंसाचारग्रस्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. या प्रवेशांसाठी फुटीरवादी नेत्यांनी दिलेली शिफारसपत्रे उपयोगी पडतात.