आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी आज (बुधवार) लखनऊ येथील लोहिया ट्रस्टमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभराच्या भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात राजकीय खळबळ उडाली आहे. तर त्याचवेळी सपा प्रमुख अखिलेश यादव पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

अखिलेश यांची भेट घेतल्यानंतर लोहिया ट्रस्टमधून बाहेर पडताना आपचे नेते संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय सिंह म्हणाले, ‘भ्रष्टाचारमुक्त उत्तर प्रदेश आणि हुकूमशाही राजवट नष्ट करायची आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आज मुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्यासाठी राजकीय चर्चा करण्यात आल्या.” युतीच्या प्रश्नावर संजय सिंह म्हणाले की, “आम्ही एकमेकांशी बोलत आहोत आणि युतीच्या दिशेने जात आहोत.” 

युतीबाबत चांगली अर्थपूर्ण चर्चा झाली असून, काही निर्णय होताच आपल्याला कळवण्यात येईल, असे संजय सिंह म्हणाले. जागांबाबत चर्चा झाली आहे का?, प्रश्नावर संजय सिंह म्हणाले की, आता समान अजेंड्यावर चर्चा झाली असून उत्तर प्रदेशला भाजपाच्या कुशासनातून मुक्त करायचे आहे. त्याबाबत चर्चा झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच एआयएमआयएमसोबत युती करण्याच्या शक्यतेवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.