सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सहावीत शिकणारी १० वर्षांची मुलगी आंदोलनात सहभागी झाल्याची दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली मनमोकळेपणाने व्यक्त होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही मुलगी देशातील व्हीव्हीआयपी संस्कृतीबद्दलही बोलत आहे. झारखंडमधील कोडरमा येथील भंगाराचे काम प्रशासनाने बंद केले असून, त्यानंतर मोठ्या प्रमाणात मजुरांना याचा फटका बसला आहे. याला विरोध करण्यासाठी कामगार आले होते, त्यात या मुलीचाही समावेश होता. समा परवीन असे या मुलीचे नाव असून ती सहावीत शिकते.

झारखंडच्या कोडरमामध्ये मजूर मोठ्या प्रमाणात भंगाराचे काम करतात आणि त्यातून आपली उपजीविका करतात. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या कामावर बंदी घातली असून काही लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रशासनाने समा परवीनच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे समा परवीन आंदोलनापर्यंत पोहोचली होती.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समा परवीन देशाच्या व्हीआयपी संस्कृतीबद्दल भाष्य करत आहे. “मी काय पंतप्रधानांची मुलगी आहे का ज्यामुळे मला त्रास होणार नाही. आम्हीसुद्धा भंगार वेचून पोट भरतो, अभ्यास करतो. आमचे भविष्य असेच उद्ध्वस्त करूण जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची मुले अभ्यास अधिकारी बनतील. माझ्या वडिलांवर खोटा खटला दाखल करण्यात आला आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरील खटला मागे घेतला जात नाही तोपर्यंत मी इथेच राहीन,” असे समा या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

 “माझ्या वडिलांनी एसपी साहेबांकडे दोनदा अर्ज केला, पण सुनावणी झाली नाही. मी इयत्ता सहावीत आहे पण भंगार गोळा करणे बंद झाल्यामुळे आम्हाला अभ्यास करता येत नाही. असेच आपले भविष्य उद्ध्वस्त करत राहायचे का? अधिकाऱ्यांची मुलं शिकून अधिकारी होतील आणि आम्ही मजुरांची मुलं तशीच निरक्षर राहू,” असे समा पुढे म्हणत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समा परवीनची उत्तर देण्याची पद्धत लोकांना आवडली आहे. प्रत्यक्षात मजुरी बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तिला अभ्यास करता येत नसल्याचा दावा या मुलीने केला आहे. इतर मजुरांची मुलेही शाळेत जाऊ शकत नाहीत.