काँग्रसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या समारंभात नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला.

यापूर्वी २००२ ते २००७ या काळात अमरिंदर यांनी पंजाबची धुरा सांभाळली आहे. शपथविधीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. सिद्धू यांच्याशिवाय ब्रह्म महिंद्र तसेच मनप्रीत सिंग बादल, धर्मसिंग धरमसोत, टी. राजेंद्र सिंह बाजवा, राणा गुरजिंत सिंग व चरणसिंग चैनी हे कॅबिनेट मंत्री तर राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून अरुणा चौधरी व रझिया सुल्ताना यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात सर्व जाती-धर्माना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न अमरिंदर यांनी केला आहे. अमरिंदर यांच्या पतियाळा या जिल्ह्य़ातून आलेले ब्रह्म महिंद्र ज्येष्ठतेमध्ये मुख्यमंत्र्यांनंतर आहेत. नियमानुसार पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांसह १८ जणांच्या मंत्रिमंडळाची मुभा आहे. मात्र सध्या मंत्रिमंडळ छोटेखानी आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शपथविधी समारंभ साधा असेल अशी घोषणा यापूर्वीच अमरिंदर यांनी केली होती. ११७ सदस्य असलेल्या पंजाब विधानसभेत काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या आहेत.