इस्रायल आणि गाझादरम्यान २४ नोव्हेंबरपासून सुरू झालेला शस्त्रविराम संपला असून पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. शस्त्रविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर दोषारोप केला. यानंतर अमेरिकेचे सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी शनिवारी (२ डिसेंबर) यावर पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी पुन्हा युद्ध का सुरू झालं आणि त्याला कोण जबाबदार आहे यावर भाष्य केलं.

दुबई विमानतळावर माध्यमांशी बोलताना अँटोनी ब्लिंकन म्हणाले, “इस्रायल-हमास शस्त्रविराम का संपला हे समजून घेणं गरजेचं आहे. शस्त्रविराम हमासमुळे संपला. हमासने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. शस्त्रविराम काळात हसामने जेरुसलेम येथे दहशतवादी हल्ला केला आणि रॉकेट हल्लेही केले. यात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. यात अमेरिकेच्या नागरिकांचाही समावेश आहे.”

“हमासने ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडण्याचं आश्वासनही पाळलं नाही, असं सांगतानाच अँटोनी ब्लिंकन यांनी अमेरिका नेहमी शांतता राखण्याला पाठिंबा देते, असं नमूद केलं. तसेच अमेरिका अद्यापही ओलिस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं.

“गाझामधील परिस्थिती संकटापेक्षाही अधिक भयंकर, कारण…”

दरम्यान, युद्ध पुन्हा सुरू होणे विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे अधिकारी व्होल्कर टर्क यांनी व्यक्त केली आहे. गाझामधील परिस्थिती संकटापेक्षाही अधिक भयंकर आहे कारण पुन्हा युद्ध सुरू झाल्यामुळे आणखी पॅलेस्टिनींचा मारले जाण्याची किंवा जबरदस्तीने विस्थापित होण्याचा धोका आहे असे टर्क म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजूनही २,८०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी कोणत्याही आरोपाविना इस्रायलच्या ताब्यात”

हमासने शस्त्रविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलने केला. तर अधिक ओलिसांची सुटका करण्याचा आपला प्रस्ताव इस्रायलने नाकारला असे उत्तर हमासकडून देण्यात आले. दरम्यान, इस्रायलने पुन्हा हल्ले सुरू केल्याबद्दल कतारने खेद व्यक्त केला आणि पुन्हा शस्त्रविराम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कतारच्या मध्यस्थीने आणि इजिप्त व अमेरिकेच्या समन्वयाने गेल्या आठवडय़ात शस्त्रविरामावर सहमती होण्यावर यश मिळाले होते. अजूनही २,८०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी कोणत्याही आरोपाविना इस्रायलच्या ताब्यात आहेत असा आरोप इस्रायलमधील मानवाधिकार संघटनेने केला आहे.