इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हे युद्ध भडकलं तर जगभरातील इंधनाच्या दरांचा भडका होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी ९०० अमेरिकन सैनिकांची तैनाती केल्याची माहिती दिली. याबाबत एएनआयने सीएनएनच्या आधारे वृत्त दिलं आहे.

पॅट रायडर म्हणाले, “इस्रायल-हमास युद्धाबाबत अमेरिकेने भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास ९०० सैनिकांची तैनाती या भागात करण्यात आली आहे.” ही माहिती देताना रायडर यांनी अमेरिकेच्या सैनिकांची तैनाती नेमकी कुठे केली याची माहिती उघड केली नाही. असं असलं तरी या सैनिकांचा हेतू इस्रायलकडे कूच करणे नसून प्रतिबंधात्मक काम करण्याचा आहे, असंही नमूद करण्यात आलं.

“इस्रायलला दोन अमेरिकन आयर्न डोम यंत्रणा”

“मी सैनिकांच्या तैनातीचं ठिकाण सांगू शकत नाही, मात्र है सैनिक इस्रायलला जात नाहीयेत हे खात्रीने सांगू शकतो. हे सैनिक स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मदत करतील,” असंही रायडर यांनी नमूद केलं. तसेच अमेरिकेने इस्रायलची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी दोन अमेरिकन आयर्न डोम यंत्रणा देण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अमेरिका आणि सहकारी देशांच्या सैन्यावर इराकमध्ये आतापर्यंत १२ वेळा हल्ला”

१७ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या काळात अमेरिकेच्या आणि सहकारी देशांच्या सैन्यावर इराकमध्ये आतापर्यंत १२ वेळा हल्ला झाला. सीरियात चारवेळा हल्ला झाला. यात ड्रोन आणि रॉकेट हल्ल्याचाही समावेश आहे, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली.