सीरियाच्या उत्तर प्रांतात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याने अमेरिका चिंतेत पडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान इस्रायलचे अध्यक्ष बेंजामीन नेतान्याहू यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओबामा यांनी ही चिंता व्यक्त केली.
सीरियातील बंडखोरांकडून झालेल्या या हल्ल्यात २४ जण मृत्युमुखी पडले होते, यात काही लष्करी जवानांचाही समावेश होता. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी अतिसंहारक रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केल्याने जगभरात चिंता व्यक्त झाली, मात्र ही शस्त्रास्त्रे सीरियात कोणी आणली, यावरून हे बंडखोर आणि अध्यक्ष बाशर असाद यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पाश्र्वभूमीवर ओबामा म्हणाले की, या शस्त्रास्त्रांची जबाबदारी घेण्यास असाद अथवा बंडखोर दहशतवादी तयार नाहीत. ते एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र अमेरिका या प्रकरणाची चौकशी करत असून त्यातून सत्य बाहेर येईल. ही शस्त्रास्त्रे किती संहारक आहेत, हे सर्वानी पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा पुन्हा वापर होणार नाही, यासाठी आम्ही योग्य कार्यवाही करू, असे ते म्हणाले.