अमेरिकेतील कॉंग्रेसचे सदस्य आणि उद्योगपतींचा समावेश असलेल्या उच्चस्तरिय शिष्टमंडळाने गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गुजरातमधील प्रगती पाहून प्रभावित झालेल्या शिष्टमंडळातील सदस्यांनी मोदींना अमेरिकेत येण्याचे निमंत्रणही दिले.
एकूण १८ सदस्यांचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व इलिनॉयसमधील रिपब्लिकन पक्षाचे कॉंग्रेसचे सदस्य ऍरॉन शॉक यांनी केले. गुरुवारी दुपारी हे शिष्टमंडळ गांधीनगर येथील मोदींच्या सरकारी निवासस्थानी आले. शिष्टमंडळतील सदस्य आणि मोदींमध्ये सुमारे एक तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली. यावेळी राज्यातील उच्चस्तरिय अधिकारी तिथे उपस्थित होते. गुजरातच्या वेगाने होणाऱया आणि पर्यावरणपूरक विकासाबद्दल मोदींनी शिष्टमंडळातील सदस्यांना माहिती दिली. खूप मेहनत घेऊन केलेल्या कामामुळे गुजरातने संपूर्ण देशावर आपली छाप पाडली असल्याचे राज्य सरकारने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गुजरात राज्याबरोबर भविष्यात काम करण्याची मोठी संधी अमेरिकेला उपलब्ध असल्याचे शॉक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुजरातमधील प्रगती आणि तेथील गुंतवणूकदारांचा वाढता ओघ पाहून अमेरिकेतील नागरिक प्रभावित झाले आहेत. गुजरातच्या प्रगतीचे भागीदार होण्यासाठीही अमेरिकेतील नागरिक उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
गुजरातच्या प्रगतीने अमेरिकी शिष्टमंडळ प्रभावित; मोदींना भेटीचे निमंत्रण
अमेरिकेतील कॉंग्रेसचे सदस्य आणि उद्योगपतींचा समावेश असलेल्या उच्चस्तरिय शिष्टमंडळाने गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

First published on: 28-03-2013 at 07:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American mission praises narendra modi invites him to us