गुन्हेगारी टोळ्यांचे लागेबांधे शोधणारे सॉफ्टवेअर

कॉल व नकाशांच्या नोंदींची माहिती यांच्या आधारे गुन्हेगारी टोळय़ांचे लागेबांधे शोधून काढणारे सॉफ्टवेअर (आज्ञावली) संशोधकांनी तयार केले आहे.

कॉल व नकाशांच्या नोंदींची माहिती यांच्या आधारे गुन्हेगारी टोळय़ांचे लागेबांधे शोधून काढणारे सॉफ्टवेअर (आज्ञावली) संशोधकांनी तयार केले आहे. या नव्या सॉफ्टवेअरचे नाव लॉगअ‍ॅनॅलिसिस असे असून, त्याच्या मदतीने फोरेन्सिक चौकशीकर्ते गुन्हेगारी टोळय़ांतील म्होरक्यांची माहिती मिळवू शकतात व मध्यवर्ती भूमिकेत कोण आहे हे समजून घेऊ शकतात. गुन्हेगारांच्या उपटोळय़ांमधील लागेबांधेही सांगू शकतात.
ब्लूमिंग्टन येथील एमिलो फेरारा व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सॉफ्टवेअर शोधले असून, त्यात फोन कॉलची कच्ची माहिती घेतली जाते व त्यातील संदिग्ध असे कॉल काढून टाकले जातात. ही माहिती मोठय़ा प्रमाणात असते. पोलिस रेकॉर्ड्समधील गुन्हेगारांचे मगशॉट्स (छातीपर्यंतचे फोटो) यात पुरवले जातात. नंतर हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या व्यक्ती वेगवेगळय़ा मार्गानी त्याचे पृथक्करण करतात. एकमेकांना त्या व्यक्ती किती वेळा कॉल करतात यावरून त्यांचे संबंध गुन्हेगारी जगतात कशा प्रकारचे आहेत हे समजते. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्हय़ूने हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. या सॉफ्टवेअर पद्धतीत दोन फोनमधील सततचा संपर्क पाहिला जातो. यात फोन हा एक नोड म्हणजे केंद्र असतो. त्यामुळे नेहमी एकमेकांना कॉल करणारे गुन्हेगारी जगातील लोक सहज समजतात, त्या टोळीमध्ये कोण व्यक्ती आहेत याचाही शोध घेता येतो. काही नियमानुसार त्या व्यक्तीचे त्या गुन्हेगारी संघटनेतील स्थानही समजते. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा खालच्या पातळीवर काम करणारे गुन्हेगार अधिक कॉल करतात, एसएमएस पाठवतात. जे डॉन किंवा त्या गुन्हेगारी टोळय़ांचे प्रमुख असतात ते फार कॉल घेत नाहीत. गुन्हा घडल्यानंतर जो हवा तोच महत्त्वाचा कॉल ते घेतात. फेरार व त्यांच्या पथकाने लॉगअ‍ॅनॅलिसिस सॉफ्टवेअरचा वापर करून १५ दिवसांत पोलिसांकडून ८४ फोनच्या नोंदी घेतल्या व दरोडे, खंडणी व बेकायदा अमली पदार्थ तस्करी यातील टोळी शोधून दाखवली. त्यातील सदस्य कोण आहेत ते सांगितले. त्यातील गुन्हेगार हे १४ उपगटांत कसे काम करून खूनही करीत होते हे दाखवून दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: American researchers developed software to find out crime gang

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या