Mary Millben on India-US Tension : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या धमक्यांमुळे भारत व अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मेरी मिल्बेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांना खऱ्या मित्रांप्रमाणे एकत्र येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. मिल्बेन म्हणाली, “अमेरिकेला भारताची आणि भारताला अमेरिकेची गरज आहे. टॅरिफ (आयात शुल्क) वॉरमुळे उभय देशांच्या धोरणात्मक भागिदारीत तणाव निर्माण होत आहे. तसेच दोन्ही देशांमधील छोट्या व्यवसायांना याचा फटका बसत आहेत.”
दोन्ही देशांच्या भल्यासाठी एकमेकांबरोबर चर्चा करणे, सामंजस्याने प्रश्न सोडवणे ही काळाजी गरज आहे असं म्हणत मेरीने ट्रम्प व मोदी यांना अडचणींवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.
अनेक वेळा इशारा दिल्यानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी चालू ठेवल्यामुळे पुढच्या २४ तासांत भारतावर लक्षणीय प्रमाणात आयात शुल्क लादले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) दिला होता. तसेच भारत अमेरिकेकडून आकारत असलेले आयात शुल्क जगात सर्वाधिक असल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्यानंतर मेरीने उभय देशांमधील वाढत्या तणावावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने भारताला २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा व रशियाबरोबर व्यापार केल्याबद्दल दंड आकारण्याचा इशारा दिला होता. त्यावर मेरीने म्हटलं आहे की “दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढायला हवा.”
भारताचं मुद्द्यावर बोट
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे एका बाजूला भारतासह जगभरातील अनेक देशांना रशियाकडून कोणत्याही प्रकारची आयात करू नका, त्यांच्याबरोबर व्यापार करू नका असं सांगतं आहेत. तसेच ट्रम्प यांनी रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांविरोधात टॅरिफ (आयात शुल्क) अस्त्र उगारलेलं असतानाच अमेरिका स्वतः मात्र रशियाकडून रासायनिक पदार्थ व खतं आयात करत आहे. याच मुद्द्यावर भारताने बोट ठेवलं आहे. यावरून ट्रम्प यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती नाही. मी याचा तपास करेन.”
दरम्यान, अमेरिकेने भारताला इशारा दिला आहे की येत्या ७ ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी केली जाईल.