Amit Shah on Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये (पावसाळी अधिवशन) चर्चा चालू आहे. आज (२९ जुलै) या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या काही प्रश्नांवर उत्तरं दिली. तसेच ते म्हणाले, “जे दहशतवादी चिदंबरम अँड कंपनीच्या काळात (यूपीए सरकारच्या काळात पी. चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री होते) भारतात दहशतवादी कारवाया करायचे त्यांना आमही ठार मारलं. आपले जवान ऑपरेशन सिंदूर या मोहिमेंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसले आणि त्यांनी दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले.”
अमित शाह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून शत्रूला सडेतोड उत्तर दिलं. हाफिज मोहम्मद जमील, मुद्दसर खादियान, याकtब मलिक, मोहम्मद हमसाद जमील, मोहम्मद युसूफ, मोहम्मद हसन या दहशतवाद्यांना ठार केलं.”
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “विरोधक आम्हाला विचारत आहेत की पहलगामचे दोषी कुठे गेले? मी मघाशी जी नावं वाचली त्यातले आठ दहशतवादी असे होते ज्यांनी चिदंबरम गृहमंत्री असताना भारतात हल्ले केले होते आणि आता ते पाकिस्तानात लपून बसले होते. त्यांना आपल्या जवानांनी शोधून ठार केलं आहे. आपल्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला या गोष्टीचा विरोधकांना अभिमान नाहीये का?”
विरोधकांनी या गोष्टीचा गर्व बाळगावा : शाह
“तुमच्या कार्यकाळात जे दहशतवादी लपून बसले होते त्यांना आमच्या कार्यकाळात आपल्या लष्कराने शोधून यमसदनी धाडलं. काल विरोधकांनी प्रश्न विचारले, त्यावर उत्तर देताना आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घाबरत घाबरत सांगितलं की आपल्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मी अधिकृत आकडेवारी तुम्हाला सांगतो. मी वाढवून सांगणार नाही. मात्र, १०० ते १२५ किंवा त्याहून अधिक दहशतवाद्यांना आपण ठार केलं आहे. विरोधकांनी याचा गर्व बाळगला पाहिजे.”
अमित शाह म्हणाले, “विरोधी बाकावरील सहकारी सातत्याने आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सुस्थितीत होतो, तर पाकिस्तानबरोबर युद्ध का केलं नाही? मला त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की युद्धाचे अनेक परिणाम होतात. खूप विचार करून असे निर्णय घ्यावे लागतात.”