Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसंच जगदीप धनकड हे नजरकैदेत आहेत हा विरोधकांचा आरोपही त्यांनी खोडून काढला आहे. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.
राहुल गांधींबाबत काय म्हणाले अमित शाह?
“राहुल गांधींनी मनमोहन सरकारने आणलेला अध्यादेश फाडला होता. तो लालूप्रसाद यादव यांचा बचाव करण्यासाठीच का? जर तोपर्यंत त्यांच्याकडे नैतिकता होती तर आता काय झालं आहे? तुम्ही सलग तीनवेळा निवडणूक हरलात म्हणून राजकीय नैतिकतेची अशी खिल्ली उडवणार का? नैतिकता चंद्र-सूर्याप्रमाणे असते त्यात बदल होत नसतो.” असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीका केली. तसंच त्यांनी जगदीप धनखड यांच्याबाबतही भाष्य केलं.
जगदीप धनखड यांच्याविषयी काय म्हणाले अमित शाह?
जगदीप धनखड यांनी यांनी राजीनामा दिला कारण त्यांना आरोग्य विषयक तक्रारी जाणवत होत्या. त्यांनी त्यांचा कार्यकाळ उत्तम प्रकारे पार पाडला. मात्र त्यांची प्रकृती बरी नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही असं अमित शाह म्हणाले आहेत. दरम्यान जगदीप धनखड नजरकैदेत आहेत असा आरोप विरोधक करत आहेत हे विचारलं असता अमित शाह म्हणाले, विरोधी पक्ष उगाचच या अफवा पसरवतो आहे. सत्य आणि असत्याची व्याख्या विरोधक काय म्हणतात त्यावर ठरत नाही, तशी ती ठरायलाही नको. उपराष्ट्रपतींनी त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे राजीनामा दिला आहे. त्यात वाद निर्माण करण्यासारखं काय आहे? त्यांनी संविधानाप्रमाणे दिलेली सगळी कर्तव्यं पार पाडली आहेत. संवैधानिक पद्धतीनुसारच राजीनामा दिला आहे. मला वाटतं यावर अधिक चर्चेची गरज नाही असं अमित शाह म्हणाले.
राहुल गांधी धनखड यांच्याबाबत काय म्हणाले होते?
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्याची चर्चा झाली. तसंच विरोधकांनी विविध आरोप केले. धनखड यांचा राजीनामा घेऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला असा आरोप झाला. तसंच धनखड यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं असा आरोप करण्यात आला. दरम्यान राहुल गांधी यांनीही यावर टीका केली होती. राहुल गांधी २० ऑगस्टला म्हणाले होते की आपल्याला पुन्हा मध्ययुगाकडे नेलं जातं आहे. मध्ययुगात आपल्या मर्जीने राजा कुणाला हटवू शकत होता. आत्ताही तसाच काळ आला आहे असं वाटतं. असं राहुल गांधी म्हणाले होते. आता अमित शाह यांनी मात्र सगळे आरोप खोडून काढले आहेत.