जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा, या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली असून जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.
जोपर्यंत भाजप अस्तित्वात आहे, तोपर्यंत जम्मू काश्मीर हा भारताचा एकात्म भाग राहील, काश्मीर हा भारतमातेचा मुकुट असून तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे सांगून ते म्हणाले, की जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर आम्ही ३७० वे कलम रद्द करू.
३७० व्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे. शहा म्हणाले, की एकाच देशाला दोन पंतप्रधान असावेत का.. यावर लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. भाजपने मोदींना पंतप्रधान केले त्यानंतर देशाची सुरक्षा बळकट झाली, यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात पाकिस्तानच्या दहशतवादी गटांनी अनेकदा भारताला लक्ष्य केले. पण मनमोहन सिंग हे मौनीबाबा होते, त्यांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. देशाच्या सुरक्षेवर आम्ही तडजोड करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, की पाकिस्तान काश्मीरचा लचका तोडू पाहत आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही. पाकिस्तानने गोळी झाडली तर इकडून आम्ही गोळे टाकू. दोन देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे, या सॅम पित्रोदा यांच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली.