Amit Shah on Bills for Removal of Ministers : केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री व मंत्र्यांना पदावरून हटवू शकणाऱ्या विधेयकाबाबत देशभर बरीच चर्चा चालू आहे. मोदी सरकारने बुधवारी (२० ऑगस्ट) लोकसभेमध्ये ‘१३० व्या घटनादुरुस्ती विधेयका’सह तीन विधेयके सादर केली आहेत. ज्यामध्ये लाचखोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा केंद्रातील, राज्यातील एखाद्या मंत्र्याला सलग ३० दिवसांचा कारावास भोगावा लागला तर त्यांची पदावरून आपोआप हकालपट्टी करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे. या विधेयकास विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, या विधेयकाचं समर्थन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “काही लोकांना तुरुंगातून सरकार चालवण्याचा पर्याय हवा आहे, म्हणूनच त्यांना इतका मनःस्ताप होतोय.”

अमित शाह म्हणाले, “विरोधी पक्ष या विधेयकाचा विरोध करून लोकशाहीची प्रतिष्ठा धुळीस मिळवू पाहत आहेत. ते जनतेला सांगू पाहत आहेत की कोणताही मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मंत्री तुरुंगातूनही सरकार चालवू शकतो. तुरुंगात राहूनही सरकार चालवण्याचा पर्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.”

तुरुंगात बसून राज्य व देशाचं सरकार चालवता आलं पाहिजे अशी विरोधकांची इच्छा आहे : शाह

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले, “विरोधकांची इच्छा आहे की भविष्यात कधी तुरुंगात गेलो तरी तिथून सरकार चालवता आलं पाहिजे, तुरुंगात राहून सहजपणे सरकार स्थापन करता आलं पाहिजे, तुरुंगातच सीएम हाऊस (मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान), पीएम हाऊस (पंतप्रधानांचं निवासस्थान) निर्माण करता आलं पाहिजे आणि तिथून पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव आणि इतर सनदी अधिकाऱ्यांना आदेश देत राज्य व देश चालवता आला पाहिजे.”

“जामीन मिळाल्यानंतर परत शपथ घ्या आणि पद सांभाळा”, शाहांचा विरोधकांना सल्ला

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “पुढाऱ्यांची नैतिकता आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेसाठी या विधेयकाची आवश्यकता आहे. कोणतेही पतंप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर आरोपांप्रकरणी अटकेत असतील आणि ३० दिवसांच्या आत त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला नाही तर त्यांना त्यांचं पद सोडावं लागेल. समजा पद सोडावं लागलं आणि त्यानंतर जामीन मिळाला तर ते पुन्हा शपथ घेऊन त्यांना हवं ते पद सांभाळू शकतात. परंतु, तुम्हाला तुरुंगात राहून सरकार चालवणं लोकशाहीसाठी उचित वाटतं का?”