भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे. यांतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (५ मार्च) जळगाव येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी मतदारांना पुन्हा एकदा भाजपाला मत देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यास सहकार्य करा, असं आवाहन केलं. तसेच अमित शाह यांनी यावेळी इंडिया आघाडीतल्या पक्षांवर हल्लाबोल केला. इंडिया आघाडीतले पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावर टीका केली. या पक्षांवर घराणेशाहीचे आरोप केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शाह म्हणाले, इंडिया आघाडीतले सर्व पक्ष स्वार्थी आहेत. त्यांना जतनेशी काही देणं-घेणं नाही. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपापल्या मुलांना मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान करायचं आहे, आपल्या मुलांना मोठं करायचं आहे. परंतु, तुमच्यासाठी (जनता) त्यांच्याकडे काहीच नाही. इंडिया आघाडीतल्या पक्षांमध्ये घराणेशाही चालते. सोनिया गांधी यांना त्यांच्या मुलाला म्हणजेच राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळे यांना मंत्री करायचं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे, एम. के. स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला उदयनिधींना मुख्यमंत्री बनवायचं आहे.

आमच्या पक्षात घराणेशाही चालत नाही. आपले मोदीजी जनतेला विकासाची गँरंटी देतात. आमच्या सरकारच्या काळात १३० कोटी लोकांना २०० कोटींपेक्षा जास्त करोनावरील लसी देण्यात आल्या. लसीकरणानंतर त्याचक्षणी लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र दिलं गेलं. लोकांना करोनामुक्त केलं. जगभरातील १०० देशांना लस देऊन भारत विश्वमित्र बनला. आता नरेंद्र मोदी भविष्यातील भारतासाठी सज्ज आहेत. आपल्याला २०३० मध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायचं आहे. २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक बनवायचं आहे. २०३६ ला भारत ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवेल. २०४० ला भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवायचं आहे. त्यासाठी आपण मून मिशन (चांद्रमोहीम) हाती घेतलं आहे. भारत भविष्याच्या दिशेने पुढे सरकतो आहे.

हे ही वाचा >> “गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्राची जनता…”, अमित शहांचा जळगावातून शरद पवारांना टोला; म्हणाले, “मला पाच वर्षांचा…”

गृहमंत्री म्हणाले, एका बाजूला नरेंद्र मोदी चंद्रावर चंद्रयान लाँच करतायत आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी (काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि रायबरेलीच्या विद्यमान खासदार) २० व्यांदा राहुलबाबाला लाँच करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे राहुलयान १९ वेळा लाँच झालं, परंतु, त्याच्या गंतव्यस्थानी कधी पोहोचलंच नाही. १९ वेळा मिशन फेल गेल्यामुळे ये यान २० व्यांदा पाठवण्याचे प्रयत्न चालू आहेत. मी जनतेला आवाहन करतो की, तुम्ही या घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांना मत देऊ नका. तुम्ही विकासाची गॅरंटी देणाऱ्या मोदींना मत द्यायला हवं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah says rahulyan failed 19 times sonia gandhi trying to launch 20th time asc
First published on: 05-03-2024 at 19:48 IST