मुंबई : आपल्याला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंत:करणानेच आपण पक्ष बदलला, अशा कबुलीनंतर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी वेगळी भूमिका मांडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यामागे उभे राहिले नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मदत केल्यानेच आपण पक्षप्रवेश केल्याचे वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माझ्यावरील सर्व आरोप खोटे असतानाही सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आली. आपण चौकशीला सामोरे गेलो. या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्या मागे उभे राहिले नाहीत. मी प्रचंड दबावाखाली होतो. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू समजावून घेतली आणि मला पाठिंबा देत न्याय दिला. अडचणीच्या काळात ज्यांनी मला मदत केली, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला, अशी भूमिका वायकर यांनी मांडली. आपल्या मुलाखतीचा विपर्यास केला, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा – मुंबई विकासावर चर्चा करण्याचे कोटेचा यांचे संजय पाटील यांना आव्हान
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी तीनदा भेटलो. एकदा ते माझ्या घरी आले. यातून मार्ग काढा. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. जे चालले आहे, ते चुकीचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून सांगा, अशी विनंती मी केली होती. त्यावर त्यांनी मी काहीही करू शकत नाही. तुम्हाला सामोरे जावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले. अशावेळी तरी पक्षप्रमुखांनी माझ्यामागे उभे राहायला हवे होते, असेही वायकर यांनी म्हटले आहे.