म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवरील दडपशाही आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या मुद्यावरुन मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अॅमनेस्टी या आंतरराष्ट्रीय संस्थेने मोठे पाऊल उचलले आहे. म्यानमारच्या नेत्या आणि स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांना धक्का देत या संस्थेने ९ वर्षांपूर्वी त्यांना दिलेला सर्वोच्च पुरस्कार परत घेतला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर लष्कराकडून झालेल्या अत्याचारावरील त्यांच्या उदासिन भूमिकेमुळे संस्थेने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे स्यू की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडन येथील जागतिक मानवाधिकारी संघटना अॅमनेस्टी इंटरनॅशनलने सोमवारी आंग सान स्यू की यांचा पुरस्कार परत घेतला. अॅमनेस्टीने २००९ मध्ये स्यू की यांना हा पुरस्कार दिला होता. त्यावेळी त्या मानवाधिकारासाठी नजरकैदेत होत्या. अॅमनेस्टीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज आम्ही अत्यंत निराश आहोत. आता तुम्ही आशा, साहस आणि मानवाधिकाराच्या रक्षणाचे प्रतीक नाहीत.. त्यामुळे आम्ही तुम्हाला २००९ मध्ये दिलेला अॅम्बेसेडर ऑफ कॉन्शन्स अॅवार्ड परत घेत आहोत. संस्थेने याप्रकरणी स्यू की यांना कळवले आहे.

म्यानमारकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे सुमारे एक वर्षांपासून म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांविरोधात लष्कराकडून अत्याचार होत असल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. म्यानमारमधील रखाइन प्रांतातील सुमारे सात लाखांहून अधिक लोकांनी तेथून पलायन केलेले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्यू की यांची मानवाधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या देशातील लष्करशाही विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना १५ वर्षे नजरकैदेत राहावे लागले होते. त्यादरम्यान त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amnesty international has withdrawn its highest honour from state counsellor of myanmar aung san suu kyi
First published on: 13-11-2018 at 10:33 IST