चंडीगड : कट्टर धर्मोपदेशक व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचे समर्थक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते असे संकेत त्याच्या एका साथीदाराकडून जप्त करण्यात आलेल्या काही संवेदनशील सामुग्रीतून मिळाले असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. दहशतवादी संघटनेत रूपांतर केली जाऊ शकेल अशी एक टोळी उभारण्यात मदत करण्यासाठी अमृतपाल हा व्यसनाधीन लोक आणि बदमाश माजी सैनिकांना लक्ष्य करत होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

अमृतपालच्या खासगी सुरक्षेत असलेल्या तेजिंदरसिंग गिल याला खन्ना पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत, तसेच त्याच्या मोबाइलच्या पृथ:करणातून ज्या अनेक गोष्टी उघड झाल्या, त्यातून हे लोक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे दिसून येते, असे पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दुबईहून परतल्यानंतर अमृतपाल सिंगने अमृतसर जिल्ह्यातील त्याच्या जल्लुपूर केहरा गावात एक व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. याच वेळी सुरू केलेल्या मोहिमेत, वाईट वर्तणुकीसाठी लष्करातून निवृत्त करण्यात आलेल्या माजी सैनिकांचाही त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत शोध सुरू केला. शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचा वापर करता येईल असा त्यामागे उद्देश होता.

गेल्या वर्षी परतल्यानंतर आणि दीप सिद्धू याच्या मृत्यूनंतर ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अमृतपालला १६ खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांचे संरक्षण होते. यापैकी सात जण तरुण होते. पुनर्वसनासाठी व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या या तरुणांना उपचारादरम्यान प्रशिक्षण देण्यात आले, त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले व त्यांना बंदूक संस्कृतीकडे ढकलण्यात आले.

भारतीय उच्चायुक्तालयातील सुरक्षेचा ब्रिटनकडून आढावा

* खलिस्तानवादी निदर्शकांकडून झालेल्या ‘अस्वीकारार्ह’ हिंसक कृत्यानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील सुरक्षेचा ब्रिटन आढावा घेईल, असे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी म्हटले आहे. सरकार अशी प्रकरणे ‘अतिशय गंभीरपणे’ घेते आणि अशा घटनांना ‘जोमदारपणे’ प्रतिसाद देईल, असे त्यांनी सांगितले.

* वाढीव सुरक्षा व्यवस्था असताना व अडथळे उभारले गेले असतानाही, खलिस्तानी झेंडे घेतलेल्या २ हजार निदर्शकांनी बुधवारी येथील भारतीय दूतावासाजवळ गोळा होऊन काही वस्तू फेकल्या, तसेच घोषणा दिल्या.

रविवारी अशाच प्रकारे हिंसक निदर्शने होऊन इंडिया हाऊसवर हल्ला करण्यात आला होता. मात्र बुधवारी निदर्शकांना अडथळे उभारून रोखण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* पगडीधारी पुरुष, काही महिला व मुले यांच्यासह निदर्शक ब्रिटनच्या निरनिराळय़ा भागांतून आले होते व खलिस्तान समर्थक घोषणा देत होते. सरकार अशी प्रकरणे अतिशय गंभीर्याने घेते आणि हल्ल्यांना ‘जोमदार’ प्रतिसाद देईल असे परराष्ट्रमंत्री क्लेव्हर्ली यांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले.