इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे. तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.

चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती. अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.

पृथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांद्रयान २ हे आजही सुस्थितीत काम करत असून आणखी पाच वर्षे कार्यरत राहील अशी आशा आहे. चांद्रयान २ मोहिमेत चंद्रावर लँडर आणि रोव्हर अलगद उतरवण्यात इस्त्रोला अपयश आलं होतं. आता चांद्रयान ३ मोहिमेच्या माध्यमातून पुढील दोन वर्षात चंद्रावर लँडर आणि रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तेव्हा चांद्रयान ३ च्या मोहिमेत लँडर आणि रोव्हर हे नेमक्या कोणत्या जागी उतरायचे याबाबत छायाचित्रांच्या माध्यमातून चांद्रयान २ हा उपग्रह एक प्रकारे मदत करणार आहे.