Kurnool Bus Accident Latest Update : आंध्र प्रदेशच्या कुर्नूल येथे झालेल्या भीषण बस अपघातात २० जणांचा जीव गेला आहे. दरम्यान या अपघाताबद्दल आता काही महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत. हा अपघात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या दुचाकी चालकामुळे झाला असण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालातून काढण्यात आला आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे अपघातात मृत्यू झालेला दुचाकी चालक बी. शिव शंकर हा दारूच्या नशेत गाडी चालवत असताना ओल्या रस्त्यावर त्याची दुचाकी घसरून पडली असे सांगितले जात आहे.
कुर्नूलचे डिआयजी के. प्रवीण यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “चालक नशेत होता आणि दुचाकीची हेडलाइट काम करत नव्हती. दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला.” या अपघातात दुचाकीचालक मरण पावला, तर त्याच्याबरोबर असलेल्या येर्री स्वामी याला किरकोळ दुखापत झाली आणि तो बचावला. या अपघातात बसेन कथितरित्या बाईकला धडक दिल्यानंतर बसला आग लागली, ज्यात बसमधील १९ प्रवाशांचाही मृत्यू झाला.
“बस डिव्हायडर जवळ आधीच पडलेल्या दुचाकीच्या संपर्कात आली. बस दुचाकीवरून गेली आणि दुचाकीला जवळपास ३०० मिटर दूरपर्यंत फरपटत घेऊन गेली. त्यानंतर स्फोट होऊन आग लागण्याची घटना घडली,” असे प्रवीण यांनी सांगितले.
अपघात होण्यापूर्वी त्याने दुचाकी चालक आणि दुचाकी या दोघांनाही रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सहप्रवासी असलेल्या स्वामीची चौकशी केली असता पोलिसांना आढळून आली आहे.
“दुचाकी चालक हा नशेत होता हे दाखवणारे पुरेसे पुरावे होतेच, पण आता आमच्याकडे ठोस पुरावा आहे कारण आम्ही घेतलेल्या व्हिसेरा (viscera) नमुन्यात अल्कोहोल असल्याचे आढळले आहे,” असे डीआयजी प्रवीण म्हणाले.
शिव शंकर हा कुर्नूलमधील बी. थंद्रापडू गावातील रहिवासी होता आणि अपघाताचे ठिकाण असलेल्या चिन्नाटेकूर परिसरापासून त्याचे हे गाव सुमारे २० किलोमीटर अंतरावर येते. तसेच तो ग्रॅनाईटचा व्यवसाय करायचा. गुरुवारी संध्याकाळी धोने येथे काही काम असल्याचे आपल्या आईला, बी. यशोदा यांना सांगून घराबाहेर पडला होता.
हा बस अपघात आता आंध्र प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी केल जात आहे. स्वामीच्या जबाबावनुसार, पोलिसांनी यापूर्वी असा निष्कर्ष काढला होता की, बसची धडक बसण्यापूर्वी दुचाकीचा अपघात झाला होता. दुचाकीचालकाने अपघातापूर्वीच दुचाकीत पेट्रोल भरले होते. याची पुष्टी करणारे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे.
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की शिव शंकर हा कथितपणे त्याच्या मित्राबरोबर पहाटे २.२४ च्या सुमारास दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आला. पेट्रोल पंपावरून बाहेर पडताना तो थोडक्यात पडताना वाचाला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात झालेली बस देखील पहाटे २.३९ वाजता रस्त्यावरून जात असताना कैद झाली आहे.
त्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची वेळ ही पहाटे २.४५ असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यांनुसार, बस दुचाकीवरून गेल्यानंतर, बसने दुचाकीला ३०० मीटर अंतरापर्यंत फरपटत नेले आणि त्यानंतर ती थांबली.
