नाटय़पूर्ण घटना, काँग्रेसची अवघड अवस्था, अशा वातावरणात आंध्र प्रदेश विधानसभेत स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आले. विधानसभेचे एकूण संख्याबळ २७९ असून सीमांध्र भागातील सदस्यांचे संख्याबळ १६० आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार पुरस्कृत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक २०१३ विधानसभेत नामंजूर करण्यात आले. त्यावर  मतविभाजन घेण्यात आले नाही. या वेळी विधानसभेत कमालीचे नाटय़ निर्माण झाले होते.
सदर विधेयक फेटाळून लावत त्याचा विचार करण्यासंबंधी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी मांडलेला ठराव सभापती नादेंदला मनोहर यांनी सदनात सादर केला. त्यावर आवाजी मतदान होऊन तो फेटाळण्यात आला. ‘सदर ठराव सदन फेटाळून लावत असून संसदेत तो मांडण्याची शिफारस करू नये, अशी विनंती राष्ट्रपतींना याद्वारे करण्यात येत आहे’, असे संबंधित ठरावात नमूद करण्यात आले. तेलंगणाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींनी विधिमंडळाकडे पाठविले होते. संसदेचे अधिवेशन येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्या वेळी सदर विधेयक मांडण्याचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे.