ब्रिटनमधील रुपर्ट मरडॉक यांच्या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात अँडी कोलसन दोषी ठरले आहेत, तर एक्स-न्यूज इंटरनॅशनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिबेका ब्रुक्स यांची मात्र या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेले आठ महिने प्रलंबित असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणास पूर्णविराम मिळाला आहे.
 ४६ वर्षीय कोलसन यांना येथील ओल्ड बेली न्यायालयाने दोषी ठरवीत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. कोलसन हे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचे अधिकृत प्रवक्ते होते. कोलसन यांच्या एके काळच्या सहकारी रिबेका ब्रुक्स यांची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
फोन टॅप करणे, न्यायदानात अडथळे आणणे, सार्वजनिक कार्यालयांमधील गैरवर्तन अशा सर्वच आरोपांमधून ब्रुक्स यांची सुटका झाली आहे. न्यूज ऑफ द वर्ल्ड या प्रख्यात वृत्तसंस्थेने बातम्या मिळविण्यासाठी अनेक वर्षे गैरमार्गाचा अवलंब केला. या संस्थेने लाचखोरी, फोन टॅपिंग, सेलिब्रेटी व्यक्तींचे संवाद चोरून ऐकणे असे अनेक अनैतिक मार्ग वापरले होते आणि त्याच प्रकरणी त्यांच्या विरोधात गेले आठ महिने खटला सुरू होता.
याची परिणती जुलै २०११ मध्ये जनक्षोभात होत न्यूज ऑफ द वर्ल्ड ही १६८ वर्षीय जुनी वृत्तसंस्था बंद होण्यात झाली होती. दरम्यान या निकालामुळे कॅमेरुन यांच्यावर कोलसन यांची हकालपट्टी करण्याबाबत दबाव वाढला आहे.