काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के अँटनी यांचा मुलगा केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते पीयूष गोयल, वी. मुरलीधरन आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला. अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख होते.

अलीकडेच ‘बीबीसी’ने गुजरात दंगलीबाबात एक माहितीपट प्रदर्शित केला होता. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होते. तर, अनिल अँटनी यांनी या माहितीपटाला विरोध केला होता. तसेच, जानेवारी महिन्यात अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

हेही वाचा : किच्चा सुदीप यांचा बसवराज बोम्मईंना पाठिंबा, प्रकाश राज यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

भाजपात प्रवेश केल्यानंतर अनिल अँटनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, “अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं, की एका कुटुंबासाठी काम करणे हा त्यांचा धर्म आहे. पण, देशासाठी काम करणे हे मला महत्वाचं वाटतं. जगात भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत. तर, जे. पी. नड्डा आणि अमित शाह हे समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छाशक्ती बाळगतात. आता देश मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे,” असं अनिल अँटनी यांनी म्हटलं.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये फक्त कणाहीनच राहू शकतात; गुलाम नबी आझादांचा राहुल गांधींवर घणाघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे वडिल ए.के अँटनी यांचा मी खूप आदर करतो. संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर आहे. राजकीय गोष्टीवर मला भाष्य करायचं नाही. पण, माझे त्यांच्यावर प्रेम आहे,” असं अनिल अँटनी म्हणाले.