Aniruddhacharya Controversy : प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून चर्चेत असतात. यातच नुकतंच अनिरुद्धाचार्य यांनी महिलांबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच यावरून अनिरुद्धाचार्य यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र, यानंतर अखेर अनिरुद्धाचार्य यांनी त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

अनिरुद्धाचार्य यांनी सांगितलं की, आपण कधीही महिलांचा अपमान करू शकत नाहीत. मात्र, आपण जी टिप्पणी केली होती ती टिप्पणी केवळ काही महिलांच्या कृतींच्या संदर्भाने होती. संपूर्ण महिलांबाबत नव्हती. अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं की, “आपला हेतू कधीही महिलांचा अपमान करण्याचा नव्हता. संपूर्ण महिलांबाबत माझं विधान नव्हतं. पण व्हायरल व्हिडिओमधून काही शब्द कट करण्यात आले आणि त्यामधून संदेश चुकीचा गेला. पण तरी माझ्या शब्दांमुळे कोणत्याही बहिणीला किंवा मुलीला दु:ख झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो.”

अनिरुद्धाचार्य यांचं विधान काय होतं?

अनिरुद्धाचार्य यांनी वृंदावनमधील एका कार्यक्रमातील व्हिडीओमध्ये म्हटलं होतं की, ज्या महिला २५ वर्षांच्या झाल्या आहेत आणि अद्याप अविवाहित आहेत, त्या लग्न करण्यास योग्य नाहीत कारण त्यांचे आतापर्यंत अनेक संबंध राहिले असतील. मुलगी असो वा मुलगा, दोघांचेही चारित्र्य चांगलं असलं पाहिजे”, असं अनिरुद्धाचार्य यांनी वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अखिलेश यादवांच्या प्रश्नावर अनिरुद्धाचार्य अडखळले होते

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि अनिरुद्धाचार्य यांच्यामधील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता. अखिलेश यादव आणि अनिरुद्धाचार्य यांची रस्त्यावर अचानक भेट झाल्याचा हा व्हिडीओ होता. मात्र, यावेळी दोघांमध्ये झालेल्या संवादाची सध्या मोठी चर्चा रंगली होती. अखिलेश यादव यांनी अनिरुद्धाचार्य यांना विचारलं की, “यशोदा मातेने श्रीकृष्णाला पहिल्यांदा कोणत्या नावाने हाक मारली. म्हणजे श्रीकृष्णाचं पहिलं नाव काय होतं?” यावर उत्तर देताना अनिरुद्धाचार्य हे काहीसे अडखळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं की, “भगवान कृष्णाला अनेक नावं आहेत. यशोदा मातेने पहिल्यांदा कन्हैया म्हटलं होतं”, असं उत्तर अनिरुद्धाचार्य यांनी दिलं. मात्र, अनिरुद्धाचार्य यांना स्पष्ट उत्तर देता न आल्याने अखिलेश यादव म्हणाले की “आजपासून तुमचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा.” अनिरुद्धाचार्य यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, “इथेच आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा झाला. तुम्हाला शुभेच्छा. मात्र, आजपासून तुम्ही कोणालाही शूद्र म्हणू नका.”