इस्लामाबाद : इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम या संस्थेने उघड केलेल्या पँडोरा पेपर्समध्ये ज्यांची नावे आली आहेत त्या सर्व नागरिकांची चौकशी करण्यात येईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे काही मंत्री व इम्रान खान यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील काहींची नावे या कागदपत्रात आली आहेत. या कागदपत्रातून अनेकांचे आर्थिक गैरव्यवहार उघड झाले आहेत. खान यांनी सांगितले की, इंटरनॅल कन्सोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट या संस्थेने अनेकांची आर्थिक गुपिते उघड केली असून त्यात पाकिस्तानच्या काही जणांचा समावेश आहे त्यांची कसून चौकशी केली जाईल.

या कागदपत्रात अर्थमंत्री शौकत तरिन,जलसाधन मंत्री मुनीस इलाही, सेनेटर फैझल वावडा, उद्योग व उत्पादन मंत्री  खुस्रो बख्तियार यांचे नातेवाईक यांची नावे आली आहेत. परदेशातील कंपन्यांशी त्यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. या  बनावट कंपन्यांत गुंतवणूक करून त्यांनी काळा पैसा दडवला आहे. पंतप्रधान खान यांनी पँडोरा पेपर्सचे स्वागत केले असून प्रतिष्ठित लोक च करचुकवेगिरी करून काळा पैसा परदेशात लपवतात हे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. आमचे सरकार या कागदपत्रातील सर्वांची चौकशी करील त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. हवामान बदलात जशी असमानता आहे तसाच प्रकार या भ्रष्टाचार प्रकरणात झाला असून ईस्ट इंडिया कंपनीने भारताला लुटले तसेच येथे झाले आहे. विकसनशील जगातील प्रतिष्ठित लोकच हे गैर प्रकार करीत असल्याचे उघड झाले आहे. श्रीमंत देशांना या पैशाच्या लुटीशी काही देणेघेणे नाही, असे ते म्हणाले.