भारताच्या बहुप्रतिक्षीत चांद्रयान-२ मोहिमेकडे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या मोहिमेची जोरदार तयारी सुरु असताना शनिवारी या मोहिमेची सुरु होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी ही घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


डॉ. सिवन यांनी सांगितले की, चांद्रयान-२ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी GSLV MK-III या यानाचा वापर केला जाणार आहे. या यानाने यशस्वीरित्या उड्डाण केल्यानंतर त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचण्यास आणि चंद्रावर उतरण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागेल.

जर चांद्रयानाने चंद्रावर बर्फाचा शोध लावला तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती निर्माण होऊ शकते. या मोहिमेमुळे संशोधनाबरोबरच अंतराळ विज्ञानातही नवनवे मार्ग खुले होतील. प्रक्षेपणानंतर ५३ ते ५४ दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ उतरेल त्यानंतर पढील १४ दिवस हे यान विविध माहिती घेण्याचे काम करेल, असे डॉ. सिवन यांनी सांगितले.

चांद्रयान-२च्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. या ध्रुवावर आजवर जगातील कोणत्याच देशाचे यान पोहोचलेले नाही. जर आपण ही जोखीम यशस्वीरित्या पार करु शकलो तर वैश्विक वैज्ञानिक समुदायाला याचा फायदा होईल. या मोहिमेसोबत जोखीम आणि लाभ दोन्हीही जोडले गेले आहेत. चांद्रयान ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. यानंतर भारत चंद्राच्या जमिनीवर उतरणारा चौथा देश बनेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्याची किरणं पोहोचू शकत नाहीत

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर कोणताही देश पोहोचू शकलेला नाही. मात्र, भारत आता या ठिकाणी आपले यान उतरवून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्याची किरणं सरळ नाही तर तिरकी पडतात. त्यामुळे येथील तापमान खूपच कमी असते.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील बहुतांश भागावर कायम अंधार असतो. त्याशिवाय या ठिकाणी मोठ-मोठे खड्डेही आहेत. या खड्ड्यांचे तापमान -२५० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास पोहोचते. इतक्या कडाक्याच्या थंडीत लँडर आणि रोवरला चालवणे मोठे आव्हानात्मक आहे. या क्रेटर्समध्ये जीवाश्मांव्यतिरिक्त पाणी देखील बर्फाच्या रुपात अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcing the date and time of the much anticipated chandrayaan 2 campaign aau
First published on: 13-07-2019 at 13:12 IST