Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून ते आजपर्यंत अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची जगात चर्चा होत आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या काही प्रमुख निर्णयांमध्ये नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क), बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा असेल किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय, अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. एवढंच नाही तर ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचा जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारावर परिमाण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, खरं तर डोनाल्ड ट्रम्प कोणते न कोणते मोठे निर्णय घेत कायम चर्चेत असतात. आता डोनाल्ड ट्रम्प आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

अमेरिकन निवडणुकीच्या पुनर्बांधणीची योजना डोनाल्ड ट्रम्प आखत आहेत. मतदान यंत्रे आणि मेल-इन बॅलेटिंग मतदानाच्या विरुद्ध मोहीम राबवणार असून या संदर्भातील आदेशावर सही करणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या संदर्भातील माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर दिली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी सांगितलं की ते पुढील वर्षी (२०२६) होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करतील आणि देशभरातील मेल-इन बॅलेटिंग आणि मतदान यंत्रांना लक्ष्य करून एक चळवळ चालवतील. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे मेल इन बॅलेटद्वारे मतदानावर बंदी आणण्याच्या तयारीत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “मेल-इन मतपत्रिकांपासून मुक्त होण्यासाठी एका चळवळीचं नेतृत्व मी करणार आहे. मेल इन बॅलेट हे पूर्णपणे चुकीची, महाग आणि वादग्रस्त अशा मतदान यंत्रांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे मतदान यंत्र अत्याधुनिक वॉटरमार्क पेपरपेक्षा दहापट जास्त महाग असतात”, असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.