Jaisalmer Pakistani Spy Arrested : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला काही दिवसांपूर्वी हरियाणामधून अटक करण्यात आली. तसेच तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आणखी काही घटना समोर आल्या आहेत. एनआयएने नुकतीच कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका जवानाला अटक केलं होतं. त्यानंतर आता अशाच प्रकारची आणखी घटना समोर आली आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली बुधवारी राजस्थानमधून एका सरकारी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केलं आहे. राजस्थान सीआयडी आणि जयपूरच्या इतर गुप्तचर विशेष पथकांनी ही कारवाई केली. या कारवाईच्या माध्यमातून जैसलमेरमधील सरकारी विभागातील एका कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. शकूर खान असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
शकूर खान हा जैसलमेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शकूर खान जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षात कर्तव्यावर होता. मात्र, शकूर खान हा संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्याशी त्याचे कथित संबंध आणि आयएसआयशी संभाव्य संबंधांबद्दलची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या. शकूर खानच्या संशयास्पद हालचालीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आता त्याची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
शकूर खान यापूर्वी काँग्रेस सरकारमधील एका माजी मंत्र्यांचा वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर पथकाला खानच्या मोबाईल फोनवर अनेक अज्ञात पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. तो या नंबरबाबत स्पष्टीकरण देण्यास अयशस्वी ठरला आहे. चौकशीदरम्यान खानने यापूर्वी ६-७ वेळा पाकिस्तानला भेट दिल्याचं कबूल केलं असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या मते त्याच्या मोबाईलवर आतापर्यंत लष्कराशी संबंधित कोणतेही व्हिडीओ किंवा संवेदनशील सामग्री आढळलेली नाही. मात्र, त्याने डिव्हाइसवरील अनेक पोस्ट डिलीट केल्याचं आढळून आलं आहे. तसेच दोन बँक खात्यांसह त्याचे आर्थिक रेकॉर्ड देखील गुप्तचर संस्थांकडून तपासले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्याला आता ताब्यात घेण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे.