लोकसभा निवडणूक व महाराष्ट्र-हरयाणासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असताना तामिळनाडूत पक्षाला खिंडार पडले आहे. तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांनी वरिष्ठ नेत्यांवर जोरदार टीका करून काँग्रेसचा त्याग केला आहे. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक तामिळनाडूचे प्रभारी आहेत.
वासन यांनी स्वत: नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, वासन यांच्यावर बेशिस्तीचा ठपका ठेवून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या आठवडाभरापासून स्वपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. ही चर्चा म्हणजे राहुल यांना पक्षाध्यक्ष करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पाश्र्वभूमीवर वासन यांनी सोनिया व राहुल यांच्यावर थेट शरसंधान न करता अप्रत्यक्षपणे एआयसीसीच्या सदस्यांना तामिळनाडू काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळासाठी जबाबदार धरले आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी वर्णी लागण्याची वासन यांना आशा होती; परंतु वासनिक व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ईवीके एलांगोवन यांचे नाव पुढे केले. त्यामुळे वासन यांनी नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. वासन यांचे मुकुल वासनिक यांच्याशी तीव्र मतभेद झाले होते. वासनिक यांनी स्वत:च्या मर्जीनुसार लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वाटप केल्याचा कथित आरोप वासन यांनी केला होता. काँग्रेसच्या उच्चस्तरीय सूत्रांनी वासन यांच्या नाराजीचे प्रमुख कारण मुकुल वासनिक यांची तामिळनाडूतील कार्यशैली असल्याचा दावा केला.