पीटीआय, श्रीनगर/फरिदाबाद

दहशतवादाविरोधात तीन राज्यांच्या पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईतून ‘जैश ए मोहम्मद’ आणि ‘अन्सार गझवात उल हिंद’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन डॉक्टरांचा समावेश असून त्यातील एक महिला आहे. या संपूर्ण मोहिमेत शस्त्रास्त्रांसह तब्बल २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली.

जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्य पोलिसांनी १५ दिवस संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यांना केंद्रीय यंत्रणांनीही सहाय्य केले. अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी सात जण जम्मू-काश्मीरचे आहेत. आरिफ निसार दार उर्फ साहील, यासीर उल अश्रफ, मकसूद अहमद दार उर्फ शाहीद (तिघे रा. नौगाम, श्रीनगर), मौलवी इरफान अहमद (रा. शोपियाँ), जमीर अहमद अहंगर उर्फ मूटलाशा (रा. वाकुरा, गांदरबल), डॉ. मुजम्मिल अहमद गेनी उर्फ मुसेब (रा. कॉइल, पुलवामा), डॉ. आदिल (रा. वानपुरा, कुलगाम) अशी या सात जणांची नावे आहेत. डॉ. शाहीन लखनौमधील आहे.

या अटकेमुळे दहशतवादी संघटनांचा मोठा डाव उधळून लावल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला. जम्मू-काश्मीरमधील डॉ. मुजम्मिल गेनी याला फरिदाबाद येथून, तर लखनौ येथून डॉ. शाहीन याला अटक करण्यात आली. डॉ. शाहीनला विमानाने श्रीनगरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या कारमध्ये ‘एके-४७’ रायफल आढळून आली. या दोघांना नेमकी केव्हा अटक करण्यात आली, ते पोलिसांनी सांगितले नाही. डॉ. मुजम्मिल हरियाणामधील अल फलाह विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. श्रीनगरमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांना तो हवा होता.

व्हाइट कॉलर’ दहशत

मोहिमेतून दहशतवाद्यांचे ‘व्हाइट कॉलर’ जाळे उघडकीस आणल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी निवेदनात म्हटले. अटक केलेले विद्यार्थी आणि मूलतत्ववादी व्यावसायिक पाकिस्तानसह अन्य काही देशांतील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असा दावा करण्यात आला. सांकेतिक भाषेचा वापर करून या दहशतवाद्यांची पैशांची देवाणघेवाण होत होती. सामाजिक आणि धर्मादाय निधीच्या नावाखाली ते निधी गोळा करून त्याचा वापर कट्टरता पसरवण्यासाठी करत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

१९ ऑक्टोबरपासून व्यूहरचना

दहशतवाद्यांना घेरण्यासाठी १९ ऑक्टोबरपासून व्यूहरचना करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. काश्मीरमधील नौगाम भागात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी फलक आढळून आले होते. त्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना इशारा दिला होता. त्याआधारे पोलिसांनी तपास मोहीम राबवल्याचे सांगण्यात आले.

ज्वलनशील सामग्री

जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांसाठीच्या सामग्रीमध्ये अमोनिअम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर यांचा समावेश आहे. यामध्ये ३६० किलो ज्वलनशील सामग्री असून, ती अमोनिअम नायट्रेट असल्याचा संशय आहे. याखेरीज फरिदाबादमधील डॉ. मुजम्मिल राहत असलेल्या भाड्याच्या घरातून काही शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छापे कुठे?

जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगर, अनंतनाग, गांदरबल आणि शोपियाँमध्ये छापे टाकले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमध्ये हरियाणा पोलिसांच्या सहाय्याने; तसेच सहारणपूर येथे उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहाय्याने छापे टाकले. फरिदाबादमध्ये डॉ. मुजम्मिल गेनी याच्या निवासस्थानी छापे टाकल्याची माहिती पोलीस आयुक्त सतेंदरकुमार गुप्ता यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या सामग्रीमध्ये ‘आरडीएक्स’ नसल्याचे त्यांनी सांगितले.

काय जप्त केले?

– २० टायमर्स (चार टायमर बॅटरीसह), पाच किलो जड धातू

– वॉकी-टॉकी सेट, रायफली आणि तीन मॅगझिन्स, ८३ जिवंत काडतुसे, आठ जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल, दोन रिकामी काडतुसे आणि दोन अतिरिक्त मॅगझिन्स. चिनी बनावटीची ‘स्टार पिस्तूल’, बेरेटा पिस्तूल, एके-५६ रायफल, एके क्रिनकोव्ह रायफल

– स्फोटके, रसायने, ज्वलनशील पदार्थ

– इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर्स, रिमोट कंट्रोल, टायमर आणि धातूंच्या पट्ट्या