पीटीआय, नवी दिल्ली

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचे विशेष आभार मानले. भारत-अमेरिकेदरम्यान दहशतवादविरोधी आघाडी मजबूत असल्याचे यातून दिसते, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, ‘‘टीआरएफ’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय योग्य वेळी झाला असून, ते महत्त्वाचे पाऊल आहे. दहशतवादाविरोधात जागतिक सहकार्याचा मुद्दा आम्ही सातत्याने लावून धरला आहे. भारताचे दहशतवादाविरुद्ध ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांबरोबर भारत काम करील.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनची सावध प्रतिक्रिया

अमेरिकेने ‘टीआरएफ’ संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर चीनने सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रादेशिक सुरक्षा राखण्यासाठी दहशतवादविरोधी सहकार्य वाढवावे,’ असे आवाहन चीनने प्रादेशिक पातळीवर देशांना केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन म्हणाले, ‘चीनचा कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोधच आहे. पहलगाम येथील हल्ल्याचाही चीन तीव्र निषेध करतो.’