अँटिग्वाने पीएनबी घोटाळ्यात फरार असलेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन भारताला दिलं आहे. गुरुवारी अमरिकेत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अँटिग्वाचे आणि बारबुडाचे परराष्ट्रमंत्री ई.पी.चेट ग्रीन यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. भारताने अँटिग्वाकडे मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी मदत मागितली होती. फरार असलेला मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये वास्तव्यास आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत पोहोचलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अँटिग्वाच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक करत मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी मदत मागितली. यावेळी त्यांनी मेहुल चोक्सी फरार असून, भारत त्याचं प्रत्यार्पण होईल अशी अपेक्षा करत असल्याचं स्पष्ट केलं. यावर अँटिग्वाचे परराष्ट्रमंत्री ई.पी.चेट ग्रीन यांनी पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं.

बैठकीनंतर जेव्हा अँटिग्वाच्या परराष्ट्रमंत्र्यांना मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताला मदत करणार का असा प्रश्न विचारला असता, ‘मला वाटतं तुम्ही यासंबंधी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललं पाहिजे, ते जास्त योग्य ठरेल’, असं उत्तर दिलं.