उत्तर प्रदेशातील सारनाथजवळ भगवान बुद्धांबाबत माहिती दर्शविणाऱ्या पुरातन शिल्पाचा शोध भारतीय पुरातत्त्व विभागाने लावला आहे. बौद्ध धर्माचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या सारनाथजवळ पुरातत्त्व विभागाने याआधीही केलेल्या उत्खननात गौतम बुद्धांशी निगडित पुरातन शिल्प सापडली होती. आता तब्बल ८० वर्षांच्या खंडानंतर पुन्हा करण्यात आलेल्या उत्खननात बुद्धांची माहिती देणारी पुरातन शिल्प आढळून आल्याचे पुरतत्त्व विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक डॉ. बी आर. मणी यांनी सांगितले की, मौर्य युगाच्या आधीच्या गोष्टींची उकल करण्यासाठी या वर्षी १९ फेब्रुवारीपासून येथे उत्खनन सुरू केले होते. या उत्खननातून भगवान बुद्धांशी निगडित असणाऱ्या अनेक गोष्टींची माहिती जगासमोर आल्याचे ते म्हणाले.