Apple manufacturing iPhone 17 in India : टेक जायंट कंपनी अॅपल भारतात आयफोन १७ च्या सर्व चार मॉडेल्सची निर्मिती करत आहे. कंपनी येत्या सप्टेंबर महिन्यात हा फोन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगनंतर या फोनचे सर्व व्हेरिएशन्स, दोन्ही प्रो व्हर्जन्स भारतातून अमेरिकेत पाठवले जातील असं ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. कंपनीने त्यांच्या भारतातील सर्व पाच कारखान्यांमधील उत्पादन वाढवलं आहे. कंपनीला अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन्सची निर्मिती चीनमध्ये करायची नाही. त्यामुळे कंपनीने चीनऐवजी इतर देशांकडे मोर्चा वळवला आहे. यामध्ये भारताला प्राधान्य दिलं जात आहे.
अॅपलने एक व्यापक धोरण आखलं आहे. ज्याद्वारे अॅपल कंपनी अमेरिकेत विकली जाणारी सर्व उत्पादनं चीनऐवजी भारतात निर्माण करणार आहे. परंतु, आता अमेरिकेने भारतावर लादलेलं आयात शुल्क (टॅरिफ) हे कंपनीसमोरचं मोठं आवाहन आहे. यामुळे कंपनीला १.१ बिलियन डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता आहे.
टाटा समूहाच्या कारखान्यांमध्ये सर्वाधिक उत्पादन
आगामी काळात भारतात निर्मिती होणाऱ्या आयफोन्सपैकी अर्ध्याहून अधिक आयफोन्स हे टाटा समूहाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भारतातील कारखान्यांमध्ये तयार केले जातील असंही ब्लूमबर्गने म्हटलं आहे. टाटाच्या तमिळनाडूमधील होसूर येथील कारखान्यात आणि फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुपच्या बंगळुरू विमानतळाजवळील उत्पादन केंद्रात मोठ्या प्रमाणात आयफोन्सची निर्मिती केली जाईल.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यात भारतातून ७.५ अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सची निर्यात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून १७ अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सची निर्यात करण्यात आली होती.
अॅपलचा भारताकडे मोर्चा
जगभरात निर्माण झालेला भू-राजकीय तणाव, व्यापाराच्या क्षेत्रातील अमेरिका व चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अॅपल कंपनीला त्यांच्या उत्पादनाची ठिकाणं बदलावी लागली आहेत. कंपनी आता चीनऐवजी भारतात निर्मितीवर अधिक लक्ष देत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने आयफोनसारख्या इलेक्ट्रॉनिक्सला टॅरिफपासून सूट दिली असली तरी ही उपकरणे अमेरिकेत विकत असताना कंपनीला स्वतंत्र शुल्काचा सामना करावा लागू शकतो. कंपनीने मार्च २०२५ पर्यंत भारतात २२ बिलियन डॉलर्स किमतीच्या आयफोन्सचं उत्पादन केलं आहे. कंपनी जगभरात आयफोन्सचं जितकं उत्पादन करत आहे त्यात एकट्या भारताचा वाटा २० टक्के इतका आहे.